लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव, स्थानिक नेत्यांच्या तीव्र गटबाजीमुळे झालेली पक्षाची वाताहात, महापालिका पातळीवर नेते विरुद्ध नगरसेवकांमध्ये असलेला टोकाचा संघर्ष अशा प्रतिकूल वातावरणात ‘लक्ष्य २०१७’ साठी पिंपरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची धुरा माजी महापौर संजोग वाघेरे यांनी स्वीकारली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विस्कळीत बालेकिल्ला दुरुस्त करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वाघेरे यांच्यावर आहे.
िपपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने महापालिकेत सलग दोनदा सत्ता मिळवली. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ, शिरूरमध्ये आणि त्यापाठोपाठ, पिंपरी, चिंचवड व भोसरी या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत, महापालिका निवडणुकीत सत्तेची ‘हॅटट्रिक’ करण्याचे अजितदादांचे नियोजन आहे. मात्र, राष्ट्रवादीतील सध्याचे वातावरण गढूळ आहे. पक्षात गटबाजीचे राजकारण ‘जैसे थे’ आहे. आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. तर, विलास लांडे पराभवाच्या धक्क्य़ातून सावरले नसून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. अण्णा बनसोडे अजूनही पक्षात कार्यरत नाहीत. पालिकेच्या कारभारात योगेश बहल व मंगला कदम यांच्या एकाधिकारशाहीवरून नगरसेवक हैराण आहेत. अशात, पूर्वी नाराज असलेले वाघेरे शहराध्यक्ष झाल्याने आता कामाला लागले आहेत. पक्षातील मरगळ दूर करण्याचे, निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना काम देण्याचे महत्त्वाचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गटबाजी नसल्याचा वाघेरेंनी दावा केला असला, तरी वास्तवात पक्षातील गटबाजीचा विळखा कायम आहे. पक्षाचे तीन तेरा वाजवणाऱ्या गटबाजीचे राजकारण मोडून काढण्याचे आव्हान नव्या शहराध्यक्षांसमोर आहे.