मराठवाडा मित्रमंडळाचे वास्तुकला महाविद्यालय आणि वास्तुकला परिषदेच्या गेली दहा वर्षे सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला असून परिषदेने महाविद्यालयाला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील परिषदेने मान्यता दिली आहे. मराठवाडा मित्रमंडळाचे वास्तुकला महाविद्यालय १९८५ पासून सुरू आहे. महाविद्यालयाला मान्यता नसल्याचे सांगून वास्तुकला परिषदेने २००७ ते २०१३ या कालावधीत महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी अडवून ठेवली. त्याबाबत महाविद्यालयाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वास्तुकला परिषदेकडील नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालयाला परिषदेने २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांसाठी मान्यताही दिली आहे. पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी (बी.आर्च.) महाविद्यालयाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, वास्तुकला परिषद यांनी महाविद्यालयाच्या वेळोवेळी केलेल्या पाहणीचे अहवाल चांगले दिले आहेत, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.