पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांचा सवाल

परंपरेला प्रश्न विचारण्यासाठी अंगी धाडस असावे लागते. नैतिकता आणि धर्माचा मूळ अर्थ हे सारे आम्ही गमावले आहे. कर्तव्य म्हणजे धर्म असेल तर या धर्माचे आम्ही पालन करतो का?, असा सवाल साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी उपस्थित केला. अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर जीवनरुपी अर्थ शिकवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि अविरत प्रकाशनतर्फे डॉ. अपर्णा जोशी यांच्या ‘राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

महाभारत हाच एक लोककथासंग्रह आहे. रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये राष्ट्रबांधणीची सूत्रे ठरू शकतात. जाती, धर्माची टोकदार अस्मिता वाढत असताना या महाकाव्याच्या आंतरजालाने आपण जोडू शकतो, असा विश्वास ढेरे यांनी या वेळी व्यक्त केला.

कुलकर्णी म्हणाल्या,की रामायण रामाची कथा आहे. त्याप्रमाणे महाभारत ही कृष्णाची, अर्जुनाची नाही, तर अवघ्या भारताची कथा आहे. महाभारत आपल्याला सत्य, सौहार्द, समन्वय आणि धाडस या चार गोष्टी शिकवते.

सहस्रबुद्धे म्हणाल्या , ‘द्या खेळाला एक तास, मूल्यातून व्यक्तिमत्त्व विकास’ या उक्तीनुसार बालरंजन केंद्र गेली तीन दशके काम करीत आहे. मुले ही टिपकागदाप्रमाणे असतात. टिपकागद जितका सछिद्र तितके शोषून घेणाऱ्या मुलांकडे ते मूल्य म्हणून कायमस्वरूपी राहते.’

‘आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसतात!’

पाठय़पुस्तकात आहे त्यापेक्षा मोठा अवकाश विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. त्यातून एखादा विद्यार्थी टिपकागदाप्रमाणे टिपेल. अभ्यास करून नवी मांडणी करेल आणि संशोधन विषय पुढे घेऊन जाईल. आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसतात, तर कालानुरूप बदलत असतात. दर वेळी त्या आदर्शाना कालानुरूप तपासून घ्यावे लागते. वाचन, संगीत, चित्र या अदृश्य आनंदातून माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया घडते, असेही ढेरे यांनी म्हटले.