करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर  राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे साधरणपणे मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. मात्र काही राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. पण अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होत नसल्याने, आज राज्यभर भाजपाच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात देखील सारसबाग येथील गणपती मंदिराबाहेर भाजपच्यावतीने टाळ वाजून आणि गोंधळ घालून, तर ॐ कारेश्वर मदिराबाहेर खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात घंटानाद करत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर यावेळी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, “मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील  मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. तसेच दररोज मंदिरात येणार्‍या भाविकांना एवढे दिवस दर्शन मिळत नाही. त्यामुळे सर्व भाविकांमध्ये कमालीची नाराजी आहे. हे लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर मंदिरे भाविकांसाठी खुली करावी.

आणखी वाचा- “मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद”… म्हणत कोल्हापुरात घंटानाद आंदोलन

यावेळी भर पावसात कार्यकर्त्यांनी घंटनाद करत राज्यसरकारचा निषेध नोंदवला. तसेच, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार, धार्मिक स्थळ दर्शन बंदी करणाऱ्या उद्धव सरकारचा जाहीर निषेध.. अशी फलकं आंदोलनस्थळी लावली गेली होती.

दारूची दुकाने उघडायला परवानगी देत आहात, तर मंदिरे उघडायला काय हरकत आहे,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सातारा येथे मांडली होती.दारु दुकानं, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडत आहात. अशा परिस्थितीत मंदिर उघडण्याचा आग्रह असेल, तर तो योग्य आहे. असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते. लॉकडाउनमुळे जिम आणि मंदिरं गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. ती पुन्हा सुरु करावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे.करोनामुळे बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्यावतीने राज्यभर होणाऱ्या घंटानाद आंदोलनासास भाजपाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.