रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरटय़ांनी बावीस लाख ६० हजार रुपये चोरून नेले. मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीन दरम्यान हा प्रकार घडला असून या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत येथील यश चौकाच्या लगत हे एटीएम आहे. चोरटय़ांनी लोखंडी पहारीने एटीएम सेंटर फोडून त्यातील मशिन फोडली. एटीएमधील २२ लाख ६० हजार रुपये चोरून नेले. या संदर्भात सुरक्षारक्षक मनोज राजाराम चव्हाण (रा. कारेगाव, ता. शिरूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यापूर्वीही   २०११ मध्ये येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सर्तकतेमुळे टळला होता. या संदर्भातील तपास पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर करीत आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसह परदेशी अविभागीय पोलीस अधिकारी शंकर केंगार यांनी भेट दिली.