पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
फटाक्यांची आतषबाजी करत मोठय़ा आवाजात डीजे लावून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाढू लागले आहेत. सैराटफेम ‘प्रिन्स’ बनून असे वाढदिवस साजरे करण्याचे उद्योग अति झाल्यामुळेच या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले असून यापुढेही कठोर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
पिंपळे सौदागर येथे अशाच प्रकारे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, त्याची छायाचित्रे फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर टाकणे महागात पडले. थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले. त्यानुसार, सांगवी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केले असून संबंधितांची धरपकड सुरू केली आहे. खेड मांजरेवाडी येथे महिन्यापूर्वी अशाच प्रकारे तलवारीने केक कापण्यात आला. ती छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्यानंतर तेथील पोलीस पाटलाने फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात निगडी प्राधिकरणात १२ जणांचे एक टोळके लोखंडी हत्यारे व धारदार कोयते घेऊन एका उद्यानात वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरून जाताना आरडाओरड करत निघालेल्या या टोळक्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्यावर धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ, िपपळे सौदागर येथे अशीच घटना घडली आहे. मुळातील या घटनेतील वाढदिवसाचा प्रकार २४ फेब्रुवारीचा आहे. मात्र, समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली वाढदिवसाची छायाचित्रे थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. या वाढदिवसाच्या वेळी एक आमदार व एका नगरसेवकासह राजकीय वर्तुळातील बरेच कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
तलवारीने वाढदिवसाचे केक कापण्याच्या प्रकारांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्या ठिकाणी असे प्रकार होत आहेत, तेथे कारवाई करण्यात येत आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी गोंगाट सुरू असल्यास पोलिसांना कळवावे. खात्री करून तेथे कारवाई करण्यात येईल.
– गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 5:04 am