पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) दहावी आणि बारावीची परीक्षा शनिवार (१५ फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १८ लाख ८९ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १२ लाख ६ हजार ८९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यंदा दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २० मार्च, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान होणार आहे. देशभरातील एकूण ५ हजार ३७६ केंद्रांवर दहावीची, तर ४ हजार ९८३ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्यांमध्ये ७ लाख ८८ हजार १९५ मुली, ११ लाख १ हजार ६६४ मुलगे आणि १९ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी ५ लाख २२ हजार ८१९ मुली, ६ लाख ८४ हजार ६८ मुलगे आणि ६ तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर ३० ते ४० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. दहा नंतर कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेचा गणवेश परिधान केलेला असणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेऊन जाता येणार नाही. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी सीबीएसईने यंत्रणा सज्ज केली आहे. विद्यार्थ्यांनी ताण न घेता परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहनही सीबीएसईने केले आहे.