पुणे- मुंबई लोहमार्गावर मळवली व कामशेत स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने शनिवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या वेळेतील पुणे- लोणावळा लोकल व काही एक्स्प्रेस गाडय़ा सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. रुळाला तडा गेल्याचा प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली.
मळवली स्थानकाचे स्टेशन मास्तर सुनील ढोबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वासातच्या सुमारास रेल्वेचे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना पाथरगाव (खामशेत) गावाजवळ रेल्वेच्या रुळाला काहीसा तडा गेल्याचे त्यांना दिसून आले. हा प्रकार रात्री घडला असण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात पोलाद आकुंचन पावते, अशा वेळी रुळावरून वेगाने गाडी गेल्यामुळे कदाचित हा तडा पडला असावा, अशी शक्यता ढोबळे यांनी व्यक्त केली.
तडा गेल्याचा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ही माहिती कक्षाला कळवून रेल्वे वाहतूक काही काळ थांबवली. तातडीने रुळ बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. तडा काहीसा थोडा असल्याने वाहतूक पूर्णपणे न थांबविता, तडा पडलेल्या भागातून अगदी कमी वेगाने गाडय़ा पुढे सोडून रुळ बदलण्याचे काम सुरू ठेवण्यात आले. मात्र, त्यामुळे काही लोकल गाडय़ा व लांब पल्ल्याच्या गाडय़ा सकाळी उशिराने धावत होत्या. काही वेळातच रुळ बदलण्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.