कामावरून घरी निघालेल्या एका महिलेची सोन्याची साखळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हिसकावली आणि पळाले. मात्र, महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर त्यातील एकाला नागरिकांनी पोलिसांकडे पकडून दिले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर डेक्कन पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. डेक्कन येथील पीवायसी मैदानाजवळील बाफना बंगल्याजवळ शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश दत्तात्रय थोरात (वय १९), विशाल किशोर नगरकर (वय २४, रा. सदाशिव पेठ) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी माधुरी अनिरुद्ध कारलेकर (वय ५३, रा. डेक्कन जिमखाना जवळ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारलेकर या शनिवारी रात्री कामावरून पायी घरी जात होत्या. पीवायसी मैदानाजवळील बाफना बंगल्याजवळ मोटारसायकलवरून तिघेजण आले. काही अंतरावर पुढे जाऊन थांबल्यानंतर दोघेजण खाली उतरले. त्यांनी कारलेकर यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. त्यांनी आरडा-ओरडा करता मैदानाच्या गेटजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन मुलास पकडले. दुसरे दोघेजण मोटारसायकवरून पळून गेले. पकडलेल्या मुलास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करून डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक भूषण दायमा, पोलीस कर्मचारी महेश निंबाळकर, राजकुमार पाटील, विवेक जाधव, सुदेश सपकाळ आणि साळुंके यांनी इतर दोघांना नवी पेठेतून अटक केली.