News Flash

शास्त्रीय संगीताची कास कधीही सोडणार नाही-महेश काळे

अधिकाधिक श्रोते घडवणं ही आपली जबाबदारी आहे असंही महेश काळे यांनी म्हटलं आहे

मला विविध प्रकारचे संगीत आवडते, मात्र मी शास्त्रीय संगीताची कास कधी सोडणार नाही. कारण शास्त्रीय संगीत हा माझा पिंड आहे असे मत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. जर आपल्याला तरुण पिढीमध्ये शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

गायक महेश काळे शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून ‘इनफ्युजन’ ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे आणत आहेत. यानिमित्त पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संकल्पनेचे सादरीकरण सर्व प्रथम एनसीपीए (NCPA) मुंबई आणि त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे अनुक्रमे येत्या दि. 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

यावेळी महेश काळे म्हणाले की, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर श्रोत्यांची एक वेगळीच लाट समोर आली. ज्यात ज्येष्ठांपेक्षा तरुण रसिकांची संख्या जास्त होती. हे मला टिकवायचे आहे. तरुणांनी शास्त्रीय संगीतात अधिकाधिक रस घ्यावा म्हणून काय करता येईल? हा विचार सुरु झाला आणि इनफ्युजन ही एक नवीन संकल्पना श्रोत्यांपुढे आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाचा गाभा हा शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. यासाठी वाजणारा वाद्यवृंद हा भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा मेळ असेल. मात्र असे असले तरी त्यांचा पाया हा भारतीय शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. म्हणजेच नवा साज लेवून आकर्षक पद्धतीने शास्त्रीय संगीत तरुणांना भावेल अशा स्वरुपात ते मी रसिकांसमोर मांडणार आहे.

त्याचसोबत मनोरंजनाचे बोट धरत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या गावाला जाण्याचा हा ध्यास आहे. पूर्वीचे श्रोते टिकवायचे कसे, नवीन तयार झालेले श्रोते अधिक कसे मिळतील आणि जे श्रोते नाहीत ते श्रोते कसे होतील याच उद्देशाने ही संकल्पना मी घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 12:10 pm

Web Title: classical singing is my first passion says singer mahesh kale in pune scj 81 svk 88
Next Stories
1 माझ्या मनात मराठी संस्कृती भिनलेली- जितेंद्र
2 निधीअभावी रस्ते विकसन रखडले
3 पुरंदर विमानतळाच्या आवश्यक परवानग्या प्राप्त
Just Now!
X