चार महिन्यांत तुफान बरसलेला आणि त्यानंतर कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे कहर घातलेला मोसमी पाऊस दसऱ्यापासून सीमोल्लंघन करणार आहे. राज्यातून आता मोसमी पाऊस माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली असून, पुढील सुमारे तीन दिवसांमध्ये राज्यात परतीचा प्रवास करून मोसमी पाऊस जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे पावसाने राज्याच्या सर्वच भागांत थैमान घातले. बहुतांश भागांत शेतीचे अतोनात नुकसान झाले. पूरस्थितीने जनजीवनही विस्कळीत झाले. कमी दाब क्षेत्रामुळेच मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास थांबला होता. २८ सप्टेंबरला देशातून परत फिरलेला मोसमी पाऊस गुजरात, मध्य प्रदेशमध्येच १५ दिवसांहून अधिक काळ रेंगाळला होता. तीन दिवसांपासून त्याच्या प्रवासाला पुन्हा चालना मिळाली आणि कमी दाब क्षेत्राचा प्रभाव ओसरल्याने राज्यातही पावसाचा जोर कमी झाला.

मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रवास वेगाने होणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागातून त्याचा परतीचा प्रवास पुढील ४८ तासांत सुरू होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यातून एकाच वेळी तो निघून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दिवसाच्या तापमानात वाढीचा अंदाज

यंदा बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या आणि महाराष्ट्रातून अरबी समुद्रात गेलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा फारसा अनुभव आला नाही. मात्र, सध्या अनेक भागांत पाऊस थांबला असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ३० अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले कमाल तापमान हळूहळू ३२ ते ३४ दरम्यान गेले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंशांवर गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. येत्या तीन-चार दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.