दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्य़ांच्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेची शिष्यवृत्ती देताना उत्पन्नाची अट घालावी, हा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने शुक्रवारी एकमताने फेटाळून लावला. पूर्वीप्रमाणेच या शिष्यवृत्तीसाठी पुण्यातील गुणवंत विद्यार्थी एवढाच निकष ठेवावा अन्य कोणतीही अट घालू नये, असा निर्णय समितीने एकमताने घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्य़ांच्यावर गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या योजनेत महापालिका प्रशासनाने खो घातला होता. ज्या कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळून होणारे उत्पन्न सहा लाख रुपयांच्या आत आहे, त्यांनाच ही शिष्यवृत्ती द्यावी, असा प्रस्ताव प्रशासाने महिला व बालकल्याण समितीपुढे मंजुरीसाठी ठेवल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पुणे शहरातील गुणवंत विद्यार्थी हा या शिष्यवृत्तीचा एकमेव निकष होता आणि तेच या शिष्यवृत्तीचे वैशिष्टय़ होते.
पुणे शहरातील जे विद्यार्थी दहावी वा बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्य़ांच्यावर गुण मिळवतील, अशा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आíथक मदत मिळावी, या उद्देशाने शिवसेनेचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी ही योजना सुरू केली होती. या योजनेत प्रत्येकी १५ ते २५ हजार रुपये एवढी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाते.
प्रशासनाने मांडलेला हा प्रस्ताव अत्यंत चुकीचा असून तो कोणत्याही परिस्थितीत शिवसेना हाणून पाडेल. विद्यार्थ्यांसह महापालिकेवर मोर्चा नेऊन हा प्रस्ताव मागे घ्यायला आम्ही भाग पाडू, असा इशारा देशपांडे यांनी दिला होता.