सुमित्रा महाजन यांनी फटकारले
भारतीय मूल्यपरंपरेचा भाग म्हणून भारतीय कुटुंबात प्राणिमात्रांना महत्त्व आहे. गाय ही पूजनीय आहे, येथील जीवनात निसर्ग आणि मानव यांच्यात दृढ नातेसंबंध आहेत या गोष्टींचा अभ्यासही भगिनी निवेदिता यांनी केला होता. सध्या मात्र गोरक्षेच्या नावाखाली काहीही प्रकार पाहायला मिळतात. गोरक्षेच्या नावाखाली केवळ धांगडधिंगाच पाहायला मिळतो, अशा शब्दांत तथाकथित गोरक्षकांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फटकारले आहे.
भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंती वर्षांनिमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ या पुस्तक संचाचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे, मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, केंद्राचे महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख प्रकाश पाठक यांच्यासह संचामधील पुस्तकांच्या लेखिका डॉ. सुरुची पांडे, प्रा. मृणालिनी चितळे आणि अदिती जोगळेकर-हर्डीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मातृभाषेतील शिक्षणातून व्यक्तीवर उत्तम संस्कार होतात. तसेच त्या शिक्षणाचा व्यक्तिमत्त्व घडण्यासाठीही उपयोग होतो. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे असून त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे महाजन यांनी सांगितले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या कन्येला इंग्रजी शिकवण्यासाठी भगिनी निवेदिता यांना विचारले. तेव्हा तिने मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावे, तिच्यातील भारतीयत्वाची ओळख त्यातूनच तिला घडेल असे बाणेदार उत्तर भगिनी निवेदिता यांनी रवींद्रनाथांना दिले होते. कला, शिक्षण, देशभक्ती, संस्कार आणि मूल्य या सर्व बाबतीत ती भारताशी एवढी एकरूप झाली की तिच्या जन्मगावातील तिच्या स्मारकावर देखील तिचा उल्लेख ‘मार्गारेट नोबेल निवेदिता – इंडियन नॅशनलिस्ट’ असा करण्यात आला आहे. एका आदर्श गुरूची ती तेवढीच आदर्श शिष्या होती. विदेशातून येऊन तिला जे भारतीयत्व समजले तसे ते आपल्यालाही समजण्याची गरज आहे.
मुक्ता टिळक म्हणाल्या, भगिनी निवेदिताने फक्त या देशावर आणि संस्कृतीवर प्रेम केले एवढेच नाही तर येथील सामाजिक उणिवा आणि त्रुटीही तिने ओळखल्या. त्यामुळेच महिलांचे शिक्षण आणि विधवांसाठी शिक्षणाच्या बाबतीत मोठे काम तिच्या हातून होऊ शकले.
विवेकानंद केंद्राच्या निवेदिता भिडे यांनी भगिनी निवेदितांच्या कार्याचा आढावा घेत तरुणांना मार्गदर्शन केले. सुधीर जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अरुण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.