पुण्यातील संभाव्य सर्व धोके लक्षात घेऊन नियोजन

माळीण व महाडमध्ये घडलेल्या दुर्घटनांतून धडा मिळाल्यानंतर आता स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपत्ती व्यवस्थापनाची जिल्हानिहाय र्सवकष योजना तयार करण्यात येत आहे. पुणे जिल्हा व शहरातील नसर्गिक तसेच मानवनिर्मित संभाव्य धोके लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व दुर्घटना घडल्यानंतरच्या नियोजनासाठी लागणारी सर्व प्रकारची माहिती एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातून साकारण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन योजनेचा उपयोग शहरातील विकासकामांसाठीही होऊ शकणार आहे.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सुहास दिवसे यांनी या योजनेबाबत माहिती दिली. सद्य:स्थितीमध्ये शासनाच्या प्रत्येक विभागाकडे त्या-त्या विभागाची माहिती आहे. मात्र, त्या माहितीचा समन्वय नाही. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडाही असला, तरी तो केवळ कागदोपत्रीच अद्ययावत होतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी किंवा घटना घडल्यानंतरच्या नियोजनासाठी आवश्यक असणारी प्रत्यक्षातील सुक्ष्म प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या र्सवकष योजनेमध्ये सर्व विभागांच्या माहितीचे संकलन व ही माहिती सातत्याने प्रत्यक्षात अद्ययावत करण्यात येणार आहे.

दिवसे यांनी सांगितले, की एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणचे रस्ते, इमारती, कार्यालये, मोकळ्या जागा, तेथील लोकसंख्या आदी गोष्टींची माहिती आवश्यक असते. ही सर्व माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जमा करण्यात येणार आहे. माहिती संकलनाबाबत एक मोबाइल अ‍ॅपही सध्या तयार करण्यात आले आहे. पुण्याचा विचार केल्यास या ठिकाणी लष्कराचे दक्षिण मुख्यालय, विमानतळ आहे. दहशतवादी कारवाया, आरोग्याच्या दृष्टीने विविध साथी, पूर, रासायनिक कारखाने आदींमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. हे धोके टाळण्यासाठी दक्ष राहणे, घटना घडल्यानंतर उपाययोजनांचा कृती आराखडा तयार असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सध्या काम करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी येणारा निधी नेमका कुठे खर्च करावा व काय काम करावे लागणार आहे, याचा आता संभ्रम राहणार नाही. त्याबाबतचे सर्व नियोजन आता तयार असणार आहे.

माळीणच्या लोकसंख्येची माहिती उपलब्ध नव्हती

माळीण गावात भूस्खलनाची घटना घडल्यानंतर किती ग्रामस्थ दुर्घटनाग्रस्त झाले असावेत, यासाठी त्या वेळी गावच्या लोकसंख्येची प्राथमिक माहिती उपलब्ध नव्हती. महाड दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकांना हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तातडीने एखाद्या जागेची गरज होती. मात्र, अशा जागेबाबत कोणतीही माहिती नव्हती. नंतर ही जागा उपलब्ध करून दिली असली, तरी आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक ठिकाणची सर्व प्रकारची माहिती आवश्यक असते. त्या दृष्टीने सध्या आपत्ती व्यवस्थापन योजना करण्यात येत असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले.