पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांमागची साडेसाती संपण्याची काही चिन्हे नाहीत. परीक्षा आणि त्याचे निकाल यांमध्ये किती प्रकारचे गोंधळ घालता येऊ शकतात,याची प्रात्यक्षिकेच जणू विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दाखवण्यात येत आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामधील गोंधळ अजूनही संपलेले नाहीत. मुळातच निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे तणावाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडला आणि तोही चुकीचा. परीक्षेला बसूनही अनुपस्थित दाखवल्यामुळे सध्या पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना नव्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतात. मुळातच ऑनलाईन परीक्षा पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. याबाबत विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सदस्य अशा सगळ्याच स्तरावरून विद्यापीठाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल विद्यापीठाने घेतलेली नाही. त्यातच आता निकालामध्येही परीक्षा विभागाने गोंधळ घातला आहे. गेल्या सत्राच्या परीक्षेचे निकाल विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले. या निकालाच्या नोंदणी पत्रकात चुका झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना मात्र चक्क लॉटरी लागली आहे. अगदी चार – पाच विषयांमध्ये नापास असलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
विद्यापीठाने सुधारित निकाल पाठवण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांना कळवले होते. गुरूवारी दुपारी चार वाजेपर्यंत महाविद्यालयांमध्ये सुधारित निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून महाविद्यालयांना कळवण्यात आले होते. मात्र, अनेक महाविद्यालयांना गुरूवारी सुधारित निकाल मिळाले नसल्याची तक्रार महाविद्यालयांकडून करण्यात आली आहे. आधी जाहीर केलेले निकाल अंतिम निकाल नव्हतेच अशी भूमिका आता विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे. मात्र, गुरूवारी रात्री उशीरापर्यंत हा निकाल विद्यापीठाने संकेतस्थळावरही जाहीर केला नव्हता.
‘‘अभियांत्रिकी प्रथम वर्षांचे यापूर्वी लावलेले निकाल अंतिम नव्हते. गुरूवारी निकाल जाहीर करण्यात आले आहेत. महाविद्यालयांनाही निकाल कळवण्यात येतील. गुणपत्रक मिळण्यासाठी मात्र अजून काही कालावधी लागणार आहे.’’
– डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रभारी परीक्षा नियंत्रक, पुणे विद्यापीठ