‘रोजच्या जेवणात अमूक तेल वापरा आणि हृदयविकारापासून दूर राहा’.. ‘ही पावडर दुधातून घ्या आणि वजन कमी करा’.. अशा अन्नपदार्थाच्या जाहिराती ‘अन्न सुरक्षा व मानदे कायद्या’चे सर्रास उल्लंघन करत असून गेल्या वर्षभरात प्रशासनाच्या पुणे विभागाने ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या अन्नपदार्थाच्या ६ जाहिरातींविरोधात कारवाई केली आहे.
विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे आणि सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी याविषयी माहिती दिली. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत अन्नपदार्थाच्या भ्रामक जाहिरातींची १५ प्रकरणे अन्न विभागाने हाताळली. यापैकी ६ प्रकरणे निवाडय़ासाठी न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाली असून त्यात उत्पादकांकडून एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
‘सूर्यफूल तेल वापरा आणि एका वर्षांत पोटात जाणारी ५ लिटर चरबी कमी करा,’ असा वायदा करणारी कारगिल फूड्स या उत्पादकांची जाहिरात दोशी ठरली आहे. या उत्पादकाला दिशाभुलीच्या कारणावरून ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्याचा तसेच मधुमेहात इन्शुलिनचे स्त्रवण सुधारण्याचा दावा करणाऱ्या ‘के. एल. एफ. निर्मल प्रा. लि.’ च्या खोबरेल तेलाची जाहिरातही फसवी ठरली आहे. शरीरातील चरबी नष्ट करून वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या ‘प्रोस्लिम वे’ या पावडरीची जाहिरातही दिशाभूल करणारी ठरली. ‘हॅलो इंडिया’ या उत्पादक कंपनीला या जाहिरातीबद्दल २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या कलम २४ नुसार अन्नपदार्थाच्या अवास्तव वैद्यकीय फायद्यांचे वायदे करणाऱ्या जाहिराती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ठरत असल्याचे संगत यांनी सांगितले. कलम ५३ नुसार अशा जाहिरातींबद्दल संबंधित उत्पादकांना न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडून १० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
 
व्हेज-नॉन व्हेज पदार्थ ओळखण्यासाठीची
चिन्हे छापण्यातही कंपन्यांची दिरंगाई
वेष्टनीकृत केलेला अन्नपदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी ते ओळखण्यासाठी पदार्थाच्या पाकिटावर विशिष्ट रंगाचे चिन्ह असणे आवश्यक अरसते. ‘गुलाबजाम मिक्स’, ‘रसमलई मिक्स’, ‘मन्चाव सूप’ अशा पदार्थावर ही चिन्हे छापलेली नसल्यामुळेही काही कंपन्यांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या ठरल्या. यात ‘गिट्स फूड’ आणि ‘कॅपिटल फूड्स’ या उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.