‘‘सत्ताधारी पक्षाला हरवणे हेच आपल्याकडील विरोधी पक्षांचे एकमेव ध्येय असते. पण सत्ताधारी पक्षाला हरवल्यानंतर काय, याची कार्यक्रमपत्रिका कुणीच स्पष्ट करत नाही. कोणताही ‘अजेंडा’ नसणे हेच भारतीय विरोधी पक्षांचे वैशिष्टय़ आहे,’’ असे मत ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेल्या ‘सेंटर पेज’ या पुस्तकाचे मंगळवारी केतकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील लेखांचे सदर ‘साधना’ साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले आहे. ‘साधना’ चे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर, कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.
केतकर म्हणाले, ‘‘गेल्या पासष्ट वर्षांत देशातील राज्य व केंद्र सरकारांत अनेक स्थित्यंतरे झाली. तरीही, काँग्रेस आणि नेहरू राजघराण्याला विरोध म्हणजेच लोकशाही आणि उदारमतवादी वृत्ती, याच निकषावर राजकारण चालले आहे. काँग्रेसला हरवणे हे भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे. पण काँग्रेसला हरवल्यानंतरचा अजेंडा काय, हे कुणालाच माहीत नाही! सरकारच्या विशिष्ट धोरणाला विरोध करताना त्याबाबतचा आपला पर्याय काय, हे विरोधी पक्ष स्पष्ट करीत नाहीत. कोणतीही कार्यक्रमपत्रिका नसणे हीच भारतीय विरोधी पक्षांची ओळख आहे.’’
द्वादशीवार म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार, मुस्कटदाबी आणि दडपशाहीविरुद्ध बोलणे गरजेचे आहे. कोणत्याही चर्चेची दोन टोके असतात. सत्य आणि मूल्य हे या दोन टोकांच्या मध्यभागी असते. दुर्दैवाने आज हा मध्यममार्ग मोडण्याचा उद्देश हीच सर्व प्रयत्नांची दिशा आहे. घोडय़ाच्या पाठीवरची गोमाशी त्याला सतत चावते आणि जागे ठेवते. असे करण्याने त्या माशीला काय मिळते, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘सेंटर पेज’ हे पुस्तक हा त्या प्रश्नाचा माझ्यापुरता लहान आविष्कार आहे.’’