लोणीतून दक्षिणेकडे इंधनाच्या चार गाडय़ाही रवाना

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीच्या कालावधीत नागरिकांसाठी जीवनावश्यक आणि उत्पादनांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या साहित्याची सध्या रेल्वेच्या माध्यमातून देशभरात वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीमध्ये रेल्वेच्या पुणे विभागातून १० एप्रिलला विक्रमी संख्येने मालगाडय़ांची वाहतूक झाली आहे. त्याशिवाय लोणी केंद्रातून दक्षिणेकडील विभागांसाठी चार गाडय़ांमध्ये इंधन पाठविण्यात आले आहे.

रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद केल्यानंतर केवळ मालवाहतुकीसाठी रेल्वेकडून गाडय़ा सोडल्या जात आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून सध्या मोठय़ा प्रमाणावर साहित्याची वाहतूक केली जात आहे. पुणे विभागातील रेल्वे लोहमार्ग देशाचा उत्तर आणि पश्चिम भाग दक्षिण-पश्चिम भागाला जोडतो. त्यामुळे पुणे-मिरज या पट्टय़ातून देशभरात जाणाऱ्या मालगाडय़ांची वेळेत आणि विनाअडथळा वाहतूक करण्याची जबाबदारी पुणे विभागावर आहे. ही जबाबदारी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य रीत्या सांभाळली. १० एप्रिलला एकाच दिवशी विभागातून १८ मालगाडय़ांची विनाअडथळा वाहतूक करण्यात आली. यापूर्वी २९ फेब्रुवारी २०१९ मध्ये एकाच दिवसात विभागातून १३ मालगाडय़ांची वाहतूक करण्यात आली होती. हा विक्रम १० एप्रिलला मोडीत निघाला.

मालगाडय़ांच्या माध्यमातून अन्नधान्य, कोळसा, भाजीपाला, तेल आदींच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. उत्तर आणि पश्चिम विभागांमध्ये गाडय़ांमध्ये साहित्य भरले जात असताना या विभागांमध्ये रिकाम्या मालगाडय़ा वेळेत पाठविण्यासाठीही नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागाशी संबंधित सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतही जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर भर देण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बंगळुरु, मेंगलोर आणि नवलूर आदी विभागांसाठी लोणी येथील केंद्रातून इंधनाच्या चार गाडय़ा पाठविण्यात आल्या असल्याचे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या नियोजनाखाली ही वाहतूक करण्यात येत असून, त्यात सहभागी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पूर्णपणे दक्षता घेतली जात असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.