करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाइन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकिंग आणि टेस्टिंगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. करोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, करोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच करोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. करोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच करोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब असून अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला करोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागात करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक सस्थांना सोबत घ्या – अजित पवार</strong>

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार म्हणाले, “पुण्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही. यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करा. गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला करोनामुक्त करूया”

करोना आणि साथीच्या आजारांचे आव्हान – आदित्य ठाकरे</strong>

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “करोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे तसेच पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. करोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.”