पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील दोनशे गावांत राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे गावांतील भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे. यापैकी ९० गावांची टँकरमुक्तींच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू असून ४७ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. यंदाच्या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळाच्या परिस्थितीवर जलयुक्त शिवार अभियानातील कामामुळे शेती आणि शेतकऱ्यांना हात दिला आहे.
राज्य सरकारने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले. लोकसहभाग या अभियानाचा मुख्य गाभा असून अभियानांतर्गत पहिल्या वर्षी जिल्ह्य़ातील दोनशे गावांची निवड करण्यात आली होती. या गावांत सलग समतल चर काढणे, शेततळी आणि वनतळी, माती नाला बांध, गॅबिअन बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, रुंदीकरण, पुनरुज्जीवन, ओढा-नाला जोड प्रकल्प अशी कामे करण्यात आली आहेत.
बारामती, पुरंदर, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना या अभियानाचा चांगला लाभ मिळाला आहे. या अभियानात निवडलेल्या गावांमध्ये चार हजारांहून अधिक कामे झाली आहेत. या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा स्थितीमध्ये या दोनशे गावांत पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे आणि जिरविण्याचे काम झाले आहे. त्यामुळे गावातील भूजल पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेले बंधारे, ओढे भरले आहेत. या दोनशे गावांपैकी १३३ गावांत पूर्वी टँकरची आवश्यकता भासत होती. अभियानानंतर यापैकी ९० गावे टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तर, ४७ गावे जलयुक्त झाली आहेत. या गावांमध्ये यंदा टँकरची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला. त्यांनी पुरंदर आणि बारामती तालमुक्यांमध्ये झालेल्या कामाची पाहणी केली.
राव म्हणाले, या अभियानांतर्गत झालेल्या कामांना बळकटी यावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नाला काठ स्थिरीकरणाचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये नव्याने झालेल्या नाल्यांच्या काठक्षेत्रावर विविध रोपे, बिया, गवत, घायपात कोंब लावण्यात येणार आहे. यामुळे या जलस्त्रोतांचे काठ स्थिर होतील आणि माती पुन्हा ओढे आणि नाल्यात जाणार नाही. टंचाईग्रस्त गावांतील भूजल पातळीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये उपयुक्त होणार आहे.