पिंपरी महापालिकेतील ‘उद्योगी’ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केलेल्या कारवाईअंतर्गत सुरू असलेली चौकशी ‘कासव’गतीने सुरू आहे. आगामी काळात ही चौकशी गुंडाळण्यात येईल, असा संशय व्यक्त होत आहे. तथापि, चौकशी पूर्ण होईल आणि दोषींवर कारवाई देखील होईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात येते.
डॉ. परदेशींच्या काळात कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू होता, त्यांनी अनेकांना निलंबित केले. सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरल्याने परदेशींची बदली झाली. त्यांनी ‘जाता-जाता’ विद्युत विभागातील मोकाट सुटलेल्या अधिकाऱ्यांचे ‘रॅकेट’ उघड केले. या उद्योगी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती. तथापि, परदेशींच्या बदलीनंतर ती मंदावल्याने अनेक शंका निर्माण झाल्या. आयुक्त राजीव जाधव यांनी ही चौकशी पुढे कायम ठेवली. मात्र, अपेक्षित वेग नाही. राजकीय दबावातून ही चौकशी गुंडाळण्याची शंका व्यक्त केली जाते. सर्वात महत्त्वाचे प्रकरण विद्युत विभागाचे आहे. मिलिंद कपिले व वासुदेव अवसरे या अभियंत्यांना सेवानिलंबित करतानाच मुख्य विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह १३ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आणि सत्ताधाऱ्यांची कृपादृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांना ‘शॉक’ दिला. या १४ पैकी अवघ्या तीन जणांनी खुलासे सादर केले व आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला आहे. अन्य ११ जणांनी तर खुलासेच दिलेले नाहीत. पळवाट म्हणून यातील एका अभियंत्याने सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला. मात्र, चौकशी सुरू असल्याने तो फेटाळण्यात आला. चौकशी गुंडाळण्यात येत असल्याची शंका सत्तारूढ पक्षाच्याच एका माजी महापौराने आयुक्तांकडे व्यक्त केली. तर, कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीच्याच एका नगरसेविकेने याबाबतची लेखी माहिती मागवली आहे. यासंदर्भात, कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, दोषींवर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.