News Flash

कात्रजचा ध्वज ठरावीक दिवशीच फडकणार

ध्वज फक्त ठरावीक दिवशीच फडकणार आहे.

देखभाल दुरुस्तीच्या निधीचा अभाव; प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरात तब्बल ७२ मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाची उभारणी महापालिकेने मोठय़ा थाटामाटात केली खरी पण ध्वजस्तंभावरील तिरंगा फडकण्यास निधीचा अडसर येत आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रभाग रचनेमुळे आणि झालेल्या राजकीय बदलांमुळे तिरंगा फडकाविण्यासाठी आवश्यक निधीची तरतूदच झाली नसल्याचे चित्र पुढे आले असून त्याला प्रशासनाची निष्क्रियताही कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे ध्वज फक्त ठरावीक दिवशीच फडकणार आहे.

कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रध्वज उभारणीची योजना पुढे आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०१६ रोजी राष्ट्रध्वज स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ पर्यंत ध्वजस्तंभावरील तिरंगा फडकत राहिला पण त्यानंतर या झेंडय़ाकडे प्रशासन आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष झाले आहे.

ध्वजस्तंभाची उभारणी झाल्यानंतर पाच ध्वज घेण्यात आले. त्याचबरोबरच ध्वजस्तंभ उंच असल्यामुळे ध्वजाचे कापड तसेच शिलाई यंत्राची खरेदीही करण्यात आली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून देखभाल दुरुस्तीसाठीची जी निविदा होती तिचा कालावधी संपला आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्येही अपेक्षित तरतूद नाही.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झालेल्या या निवडणुकीत बहुतांश नगरसेवकांचे प्रभाग बदलले. सध्या या प्रभागाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन-दोन नगरसेवक करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित तरतूद झालेली नाही, असा आरोप मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. प्रभागातील नगरसेवकांना अन्य कामांसाठी तरतूद करण्यासाठी निधी आहे. मात्र देशाच्या ध्वजस्तंभासाठी निधी नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे त्यांनी परवानगी दिल्यास झेंडा कायम फडकत राहील, याची जबाबदारी मी स्वीकारेन, असेही मोरे यांनी सांगितले.

वैशिष्टय़े

  • कात्रज येथील राष्ट्रध्वजाच्या स्तंभाची उंची २३७ फूट असून वजन १४ टन एवढे आहे. त्याचा पाया साडेचार फूट व्यासाचा आहे.
  • एक हजार मेगावॉट क्षमतेच्या दिव्यांमुळे रात्रीही राष्ट्रध्वज सहज दिसू शकतो.
  • या उंच ध्वजस्तंभावर लावण्यात आलेल्या ध्वजाची लांबी ही ९० फूट असून रुंदी ६० फूट आहे.
  • ध्वजाचे वजन १०० किलो आहे.
  • ध्वजाला जमिनीवर अंथरण्यासाठी तब्बल सहा गुंठे जागेची आवश्यकता लागते.
  • या कामासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
  • फ्लॅगकोड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.
  • रात्रीच्या वेळी ध्वज प्रकाशमान राहण्यासाठी खास विद्युत व्यवस्थाही करण्यात आली असून खांबावरील भागात ‘अ‍ॅक्टिव्हेशन ऑबस्ट्रक्शन लॅम्प’ बसविण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 5:30 am

Web Title: katraj flag highest flag in maharashtra
Next Stories
1 निगडीतील ध्वज फडकता ठेवण्यात अडचणी
2 देशभरातील अभ्यासकांसाठी ‘ज्ञानेश्वरी’चे तत्त्वज्ञान हिंदीतून
3 ‘मुख्यमंत्र्यांनी शेतकरी असल्याचे सिद्ध करावे’
Just Now!
X