ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून चाचपणी सुरू

पुणे : हैदराबाद येथील केबीआर पार्क चौकातील पादचारी पट्टय़ांवर बसविण्यात आलेली एलईडी सिग्नल यंत्रणेची देशभरात चर्चा झाली आहे. समाजमाध्यमावर या सिग्नल यंत्रणेची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने अशा प्रकारची सिग्नल यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

हैदराबाद येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीकडून प्रायोगिक तत्त्वावर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख हैदराबादेतील केबीआर चौकातील सिग्नल यंत्रणेची ध्वनिचित्रफीत नुकतीच पाहिली. त्यानंतर पुण्यात अशा प्रकारची सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल का? यादृष्टीने विचार केला. हैदराबाद पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बरोबर संपर्क साधण्यात आला. एलईडी सिग्नल यंत्रणेबाबतचे सादरीकरण तसेच माहिती देण्यासाठी हैदराबाद येथील माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील दोन अभियंत्यांनी सोमवारी वाहतूक  शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. सिग्नलबाबतची चाचपणी सुरू  माहिती वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नियोजन) अरविंद कळसकर यांनी दिली.

पादचाऱ्यांसाठी उपयुक्त, बेशिस्तांना चाप

एलईडी सिग्नल यंत्रणा पादचारी पट्टय़ांवर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या दृष्टीने अशा प्रकारचे सिग्नल उपयुक्त ठरतील. रात्रीच्या वेळी पादचारी पट्टे स्पष्टपणे दिसतील. जेणेकरून पादचाऱ्यांना चौक ओलांडणे शक्य होईल. ठराविक वेळेनंतर पादचारी पट्टय़ांवरील एलईडी सिग्नल यंत्रणेतील हिरवे दिवे लाल झाल्यानंतर वाहनचालक पादचारी पट्टय़ांपासून काही अंतरावर थांबतील. या यंत्रणेमुळे पादचारी पट्टय़ांवर वाहने उभी करणाऱ्यांवर वाहनचालकांना चाप बसेल.

प्रायोगिक तत्त्वावर..

शहरातील प्रमुख चौकात प्रायोगिक तत्त्वावर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी एलईडी सिग्नल यंत्रणा स्प्ष्टपणे दिसेल. मात्र, दिवसा एलईडी सिग्नल यंत्रणा कितपत प्रभावी ठरेल, यादृष्टीने अभ्यास करण्यात येणार आहे.