करोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटनबंदी असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरासह पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पर्यटनबंदी मागे घेतल्याच्या निर्णयाबाबत स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
लोणावळा आणि खंडाळ्याच्या परिसरासह पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी घाट, मुळशी, मावळ परिसरात वर्षांविहारासाठी मोठय़ा संख्येने मुंबई-पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक येतात. करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मावळ तालुक्यात असलेले गड, किल्ले, लेण्या तसेच पवना धरणाच्या परिसरातही मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देतात. बंदी उठविल्याने पर्यटकांना हे परिसर खुले झाले आहेत.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून पर्यटनबंदी मागे घेण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मावळ तालुक्यातील ग्रामीण भाग पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. पर्यटनबंदी असल्याने तेथील ग्रामस्थांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. शेळके यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
नियमांचे पालन करून पर्यटन : पर्यटनबंदी मागे घेण्यात आली असली, तरी पर्यटक तसेच ग्रामस्थांनी करोनाचा संसर्ग विचारात घेऊन नियमांचे पालन करावे. पर्यटक तसेच ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:18 am