मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात जोरदार?

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दोन ते तीन दिवसांपासून पाऊस परतला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहेत. येत्या चार दिवसांत या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पुढील चार दिवसांत विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, २४ आणि २५ जुलैला मुंबई, ठाण्यासह कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दीर्घ विश्रांतीनंतर पाऊस परतल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नगर, जामनेर, कन्नड मालेगाव, श्रीगोंदा, चाळीसगाव, नेवासा, बारामती, अमरावती, बुलढाणा, उल्हासनगर, शहापूर, पालघर, खेड, म्हसळा, भिरा येथे मोठय़ा पावसाची नोंद झाली.

कोकणामध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. पुढील चार दिवस राज्यात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे. कोकण विभागासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पनसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर त्यानंतर दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.