‘ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव’ या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी आंदोलन करण्यात आले.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि इतर प्रादेशिक निवडणुकींमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरफार होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. तसेच एकंदर मतदान प्रक्रियेमध्ये बरीच अनियमितता आढळून येत आहे. या ईव्हीएम मशिनच्या सदोष प्रणालीमुळे लोक रस्त्यावर उतरून उपोषण आणि मोर्चे काढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहे. या पाश्र्वभूमीवर सामान्य मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडय़ांची तफावत समोर मांडत भाजप सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. त्या म्हणाल्या, परिपक्व निवडणूक म्हणजे, अचूक प्रक्रिया राबवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या परिच्छेद क्र. २९ नुसार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी एश्ट मशीन श्श्ढअळ प्रणालीला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तसेच परिच्छेद क्र. ३१ नुसार व्हीव्हीपीएटी प्रणालीसाठी सरकारने आवश्यक आर्थिक निधी दिला पाहिजे. याबाबत सत्ताधारी शिताफीने दुर्लक्ष करत आहेत. भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यसभेत निवडणूक प्रक्रिया सुधारणा संबंधी चर्चेत मी ईव्हीएम मशीनसंदर्भात प्रश्न उपस्थित करून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील त्रुटींकडे लक्ष वेधले होते. यापुढील निवडणुका मतपत्रिकांचा वापर करून पार पाडाव्यात. काँग्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले,की २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभेच्या निवडणुकीतही ईव्हीएम मशीनद्वारे विजय संपादन केला. मात्र, महापालिका निवडणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भाजपचे नगरसेवक निवडून आणले आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचे प्रकर्षांने जाणवू लागले. अनेक प्रभागांमध्ये प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मशीनमध्ये मोजण्यात आलेले मतदान यामध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करता येऊ शकते हे सिद्ध झाले. या मशीनविरोधात जनआंदोलन उभारून मतदान मतपत्रिकेवरच झाले पाहिजे ही मागणी करण्यात आली आहे. आमदार जयदेव गायकवाड, महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे महापालिका गटनेते अरिवद शिंदे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, अंकुश काकडे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.