राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयाचं शनिवारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. करोना काळात झालेल्या गर्दीमुळे राष्ट्रवादीवर प्रचंड टीका झाली होती. अजित पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त करत आयोजकांवर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी सुरूवातीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सहा जणांनाही जामीन मंजूर केला.

करोनामुळे गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असतानाच पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. गर्दी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे लोकांना गर्दी करू नका असं आवाहन सातत्यानं करत असताना ही गर्दी झाली. त्यामुळे जोरदार टीका करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त करत आयोजकांवर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली होती. त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- गर्दीसाठी अजित पवार दोषी नाहीत; चंद्रकांत पाटील यांची बचावात्मक भूमिका

कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात करोना नियमांची पायमल्ली झाल्यानं अजित पवार यांनी कार्यक्रमातच दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच कार्यक्रम ज्यांनी आखला होता, त्यांच्यावर कारवाई करायला सांगतो, असेही त्यांना जाहीर करावे केलं होतं. “साधेपणाने, नियमाचे तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. नियम पाळा, असं आम्ही जनतेला सांगतो; पण अशा गर्दीच्या कार्यक्रमांना मला बोलवून अडचणीत टाकले जाते. धरता येत नाही आणि सोडता येत नाही, अशी माझी अवस्था होते,” अशा शब्दांत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली होती.

हेही वाचा- मंत्र्यांनी गर्दीचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा!; अजित पवार यांचा वडेट्टीवार यांना इशारा

या कार्यक्रमात झालेल्या गर्दी प्रकरणी आयोजक आणि शहर अध्यक्षांवर करोना विषाणू (कोविड-१९) संसर्ग प्रतिबंधक नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८,२६९,२७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ब, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना २०२० कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी प्रशांत जगताप यांच्यासह सहा जणांना अटक केली. अटकेनंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.