नेपाळने सीमा रेषेवरील काही भाग आपला असल्याचा नकाशा, पुढे आणला. त्यावरून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशाच्या संबंधवर परिणाम दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणाऱ्या नेपाळी बांधवांनी एकत्रित येऊन, भारत- नेपाळ मैत्री परिवार ही मोहीम हाती घेतली आहे. नेपाळने भारतासोबत मैत्रीचे संबंध ठेवावे, चीनच्या कुरापतींना नेपाळने बळी पडू नये, अशी मागणी नेपाळचे पंतप्रधान शर्मा ओली यांना उद्देशुन यावेळी करण्यात आली.

भारत नेपाळ मैत्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अजय अधिकारी म्हणाले की, भारतातील अनेक भागात नेपाळ येथील ५० लाखांहून अधिक नागरिक, मागील कित्येक वर्षापासून राहत आहेत. या देशात आम्ही अनेक व्यवसाय करीत असून चांगल्या प्रकारे राहत आहोत. येथील नागरिक आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करीत आहेत. त्यामुळे चीनकडून नेपाळला फुस लावली जात आहे. त्याला बळी पडू नये, अन्यथा चीन विरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.