आनंद अंतरकर यांची खंत; ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाला पुरस्कार प्रदान

आपल्याला विरामचिन्हांचा विसर पडत असून मराठी भाषेचे सौंदर्य आणि सौष्ठव  हरपत चालले आहे. भाषा किती बिघडली आहे आणि दररोज खंगत चालली आहे याची प्रचिती दररोज वृत्तवाहिन्यांवरील मराठी पाहिल्यानंतर येत असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत असताना भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक आनंद अंतरकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. वाचक वाचायला उद्युक्त होणार नसतील तर दिवाळी अंकांचे प्रकाशन करून आणि साहित्य संमेलने घेऊन उपयोग होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या दिवाळी अंकांना अंतरकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आलेले ‘विविध ज्ञानविस्तार’कर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘लोकरंग’ पुरवणीचे संपादक रवींद्र पाथरे यांनी स्वीकारले; त्या प्रसंगी अंतरकर बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्षा सुनीताराजे पवार आणि कार्यवाह वि. दा. पिंगळे या वेळी उपस्थित होते.

अंतरकर म्हणाले,‘ नियतकालिकाचे संपादन या कार्याला मराठीमध्ये फारशी प्रतिष्ठा नाही. अनेकदा संपादकाचा साधा नामोल्लेखही होताना दिसत नाही. याविषयी चीड किंवा मत्सर नसला तरी या गोष्टीकडे थंड परिस्थिती म्हणून पाहावी लागेल. संपादन ही दृष्टीने आणि बुद्धीने अनुभवण्याची ६५ वी कला आहे. संपादक म्हणून घडण्यासाठी आपल्यातील लेखकाला मारता आले पाहिजे, हा धडा मला वडील अनंत अंतरकर यांनी दिला. संपादन करताना मला साहित्याचे मुक्त प्रवाह पाहता आले. ‘हंस’चे कार्यालय हे माझ्यासाठी विद्यापीठ होते. संपादक हा केवळ नियतकालिक आणि वाचकांना जोडणारा दुवा नाही, तर तो  साहित्याच्या अभिवृद्धीसाठी काम करणारा कर्णधार असतो. अभिनय कला आणि क्रिकेटमध्ये चेंडू फटकाविण्याला असते त्याप्रमाणे भाषेलाही ‘टायमिंग’ असते, ही गोष्ट मला संपादनातून समजली.’

दैनंदिन वृत्तपत्राच्या कामाबरोबरच दिवाळी अंकाच्या माध्यमातून नवे विषय आणि प्रबोधनकारी मजकूर देण्याच्या ‘लोकसत्ता’च्या प्रयत्नांना या पारितोषिकाच्या रूपाने दाद मिळाली आहे, अशी भावना पाथरे यांनी मनोगतामध्ये व्यक्त केली. जाणीव प्रगल्भ होण्यासाठी दिवाळी अंक घेतले जातात असा समज आहे. पण, ज्योतिषविषयक दिवाळी अंक सर्वाधिक खपतात हे वास्तव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.