पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच दररोज सापडणाऱ्या रुग्णांपैकी कमी रुग्णांना प्राणवायूची गरज भासत आहे. परिणामी शहरासह जिल्ह्य़ात वैद्यकीय प्राणवायूची मागणी २५ टक्क्यांनी घटली आहे. सध्या प्राणवायू सिलिंडरची उपलब्धता मुबलक असून उत्पादक कं पन्यांकडूनही प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होत आहे.

पुण्यात आयनॉक्स आणि टायोनिपॉन कं पन्यांकडून अनुक्रमे १४९ टन आणि ८० टन उत्पादन करण्यात येत आहे. या कं पन्यांची उत्पादन क्षमता २७२.७४ टन आहे. तसेच ठाणे जिल्ह्य़ातूनही प्राणवायू उपलब्ध करून देण्यात येतो. सध्या शहरासह जिल्ह्य़ातील शासकीय आणि खासगी रुग्णालये, करोना काळजी केंद्रांकडून सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याने प्राणवायूची मागणी कमी झाली आहे. जिल्ह्य़ात प्राणवायू सिलिंडर भरून देणाऱ्या प्रकल्पांची संख्या १७ आहे.

राज्य सरकारने वैद्यकीय वापरासाठी प्राणवायू उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून प्राणवायू सिलिंडर भरून देणाऱ्या प्रकल्पांना वैद्यकीय वापरासाठी २४ तासांत परवानगी देण्यात येत आहे. प्राणवायू पुरवठय़ातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने प्राणवायूचे टँकर वाहतूक कोंडीत अडकू  नयेत, यासाठी प्राणवायू टँकरना रुग्णवाहिके चा दर्जा दिला आहे. त्यामुळे प्राणवायूच्या पुरवठय़ात सुसूत्रता आल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, चाकण येथील अधिक क्षमतेचा एअर लिक्विड हा प्राणवायू उत्पादन प्रकल्प ऑक्टोबरअखेर सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शहरासह जिल्ह्य़ात वैद्यकीय प्राणवायू मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. परिणामी राज्यातील इतर जिल्ह्य़ांनाही पुण्यातून प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

विभागातही प्राणवायूची मागणी घटली

पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेल्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यात दररोज २९० टन प्राणवायूची मागणी होती. ही मागणी आता घटली असून दररोज १८० मेट्रिक टन प्राणवायूची मागणी आहे. याबरोबरच पुणे विभागातील इतर जिल्ह्य़ांपैकी सांगलीत २६ मे. टन, साताऱ्यात १६ मे. टन, कोल्हापुरात ३८ मे. टन आणि सोलापुरात २१ मे. टन प्राणवायूची गरज आहे. पुणे विभागात ३५० मे. टन प्राणवायूची उपलब्धता असून मागणी २८१ मे. टनची आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे. तसेच गरज असलेल्या रुग्णांसाठीच प्राणवायूचा वापर करण्याबाबत रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या प्राणवायूच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

– एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग