‘आयआरसीटीसी’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रवाशांची मागणी

पुणे : पुणे- मुंबई दरम्यानची सर्वात महत्त्वाची गाडी असलेल्या डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्या आढळल्यानंतर संबंधित ठेकेदाराला दंड झाला असला, तरी खानपान व्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी)  कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. या यंत्रणेच्या कारभारात हलगर्जी होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

गाडीमध्ये ठेकेदारांकडून देण्यात येणाऱ्या खानपानाचा दर्जा तपासणे, प्रवाशांची तक्रार नोंदवून घेणे आदी कामांसाठी पेंट्री कार किंवा डायनिंग कार असलेल्या प्रत्येक गाडीमध्ये आयआरसीटीसीचा कर्मचारी बंधनकारक आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्याला प्रत्येक दिवसाला वेतनाशिवाय ५६० रुपये भत्ता आणि मोफत खानपान मिळते. या कर्मचाऱ्याने गणवेश घालणे आणि त्यावर ओळखपत्र लावणेही सक्तीचे आहे. मात्र असा कोणताही कर्मचारी प्रवाशांना गाडीत दिसत नाही.

डेक्कन क्वीनमध्ये काही दिवसांपासून प्रवाशाच्या आमलेटमध्ये किडे आढळून आले होते. त्यावेळीही संबंधित कर्मचाऱ्याकडून प्रवाशाला योग्य मदत मिळू शकली नाही.

डेक्कन क्वीनमधील खाद्यपदार्थात आळ्याप्रकरणी खाद्यपदार्थाच्या दर्जा तपासणीची जबाबदारी असलेल्या आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्याला  शिक्षा अपेक्षित आहे, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी सांगितले.