तीन वर्ष रखडलेल्या वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी सुरू

पिंपरी : जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी गुरुवारपासून (१ जुलै) सुरू होणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रमुख १३ रस्त्यांसह काही उड्डाणपुलांखालील जागा मिळून सुमारे ४५० ठिकाणी ‘पे अँड पार्क’नुसार वाहने लावताना नागरिकांना शुल्क द्यावे लागणार आहे.

पालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वाहनतळ धोरणाविषयी मे २०१८ पासून नुसतीच चर्चा होत होती. गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १ जुलैपासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. मुंबईतील ‘निर्मला ऑटो क्रेन सेंटर’ यांना वाहनतळाचा ठेका देण्यात आला आहे.

टेल्को रस्ता, स्पाइन रस्ता, नाशिक फाटा-वाकड बीआरटी रस्ता , जुना मुंबई-पुणे रस्ता,  एमडीआर, काळेवाडी-देहू आळंदी रस्ता, औंध रावेत रस्ता, निगडी वाल्हेकरवाडी रस्ता, टिळक चौक ते बिग इंडिया चौक, प्रसुनधान सोसायटी रस्ता, थेरगाव गावठाण रस्ता, नाशिक फाटा ते मोशी, वाल्हेकरवाडी रस्ता या प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, भोसरी, वाकड, रहाटणी, चिंचवड, निगडी भक्ती-शक्ती, पिंपळे सौदागर व पवळे उड्डाणपूल या पुलाखालील जागाही सशुल्क वाहनतळासाठी वापरण्यात येणार आहेत.

राजकीय पक्षांचा विरोधी सूर

वाहने लावण्यासाठी शुल्क आकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमने तीव्र विरोध केला आहे. करोनाकाळात शहरवासीयांना लुटण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी तत्काळ न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. आवश्यकता नसताना हे धोरण राबवण्यात येत असल्याचे सांगत नागरिकांच्या दृष्टीने त्रासदायक ठरणारा हा निर्णय रद्द करण्याची मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे. भाजपचे सरचिटणीस राजु दुर्गे यांनीही विरोध दर्शवणारे निवेदन महापौरांना दिले आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या ‘पे अँड पार्क’साठी रस्त्यावर पट्टे आखून अशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे.