व्यापाऱ्यांचा सम-विषम दिनांक योजनेला विरोध कायम

पुणे : शहरातील मॉल येत्या बुधवारपासून (५ ऑगस्ट) खुले  ठेवण्यास  प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार मॉलमधील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत. मात्र, शहरातील व्यापाऱ्यांवर घातलेल्या निर्बंधामुळे व्यापारी वर्गात नाराजी असून शहरातील दुकाने रोज उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी शहरातील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

प्रशासनाने येत्या ५ ऑगस्टपासून मॉल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांना सम-विषम दिनांक योजनेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत दुकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मॉल सातही दिवस सुरू राहणार असून व्यापाऱ्यांवर मात्र निर्बंध घातले आहेत. प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक आहे, अशी टीका पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंदा रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केली आहे. व्यापारी महासंघाकडून याबाबत पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टाळेबंदीत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. पुण्यातील दुकाने टाळेबंदी लागू होण्यापूर्वीच बंद करण्यात आली होती. दुकाने बंद असल्याने व्यापारी वर्ग आर्थिक संकटात आला. कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे, वीज बिल, घरखर्च अशा अनेक समस्यांना व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील दुकाने सम-विषम दिनांक योजनेनुसार खुली झाली. मात्र, अपेक्षेएवढा व्यवसाय होत नसल्याने व्यापारी निराश आहेत. महिन्यातून पंधरा दिवस दुकाने खुली ठेवण्यात येत आहेत. सम-विषम दिनांक योजनेला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आठवडय़ातील सात दिवस खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानंतर तेथील प्रशासनाने सम-विषम दिनांक योजना बंद केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबईप्रमाणेच दुकानांबाबतचा निर्णय लवकरच

मुंबईत रोज दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेच पुणे तसेच परिसरातील दुकाने रोज सुरू करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील ३० हजार व्यापाऱ्यांचा विरोध

पुणे व्यापारी महासंघाबरोबर शहरातील विविध व्यावसायिकांच्या ८५ संघटना संलग्न आहेत. सम-विषम दिनांक योजनेला शहरातील ३० हजार व्यापाऱ्यांनी विरोध केला. पुणे महापालिका आणि व्यापारी महासंघाने दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची करोना चाचणी सुरू केली आहे. आतापर्यंत एकही व्यापारी करोनाबाधित आढळून आला नाही. व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला नेहमीच सहकार्य करण्यात येते. गेले चार महिने व्यापाऱ्यांवर असलेल्या निर्बंधामुळे व्यापारी, कर्मचारी वर्गापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे, असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.