“केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास ९० दिवसापासून आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी बसून आहेत. तेथील आंदोलनकर्त्यां शेतकर्‍यांना संसदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी म्हणणे म्हणजे देशातील प्रत्येक आंदोलकाला दिलेली शिवीच असून, आजवर झालेल्या आंदोलकांचा त्यांनी अपमान केला आहे,” अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना आंदोलनजीवी शब्दाचा उल्लेख केला होता. देशात आंदोलनजीवी निर्माण झाले आहेत, असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या या विधानावर गणेश देवी म्हणाले की, “या सरकारने विरोधी विचार अस्तित्वात ठेवायचा नाही, या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहे. तसेच पंतप्रधान ज्या सभागृहात राहून बोलले ते सभागृह देखील आंदोलनातून निर्माण झाले आहे. पण ते विसरले आहेत,” असं म्हणत देवी यांनी मोदींवर निशाणा साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आपल्या देशाचा इतिहास पाहिला, तर देशाचा जन्म हा आंदोलनातून झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकांना असं बोलण्याची गरज नव्हती. तसेच हे आंदोलन जगभरात पोहोचले आहे. या आंदोलनाची दखल जगाने घेतली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मागणीची दखल सरकारने घ्यावी आणि चर्चेतून मार्ग काढावा,” अशी मागणी त्यांनी केली.

“या आंदोलनात एखाद्या विशिष्ट राज्यातील शेतकरी आहेत. यामध्ये खलिस्तानी आणि इतर सहभागी झाले आहे. त्यामध्ये काही तथ्य नसून, जर तसे असते तर एवढे दिवस कडाक्याच्या थंडीत बसले असते का?,” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. “त्या आंदोलनात देशातील अनेक भागातील शेतकरी सहभागी झाले आहेत,” असं देवी यांनी सांगितलं.