पुण्यात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे उघड होऊ लागले आहेत. शहरात अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात आहे. त्याचे प्रमाण रोजचे तब्बल २५० ते ३०० टन इतके जास्त असून, त्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचाही समावेश आहे. हा कचरा असाच उघडय़ावर जाळला जात असल्याने त्यातून घातक

( शहरात साठणारा कचरा, त्यात प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे)
( शहरात साठणारा कचरा, त्यात प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे)

वायू बाहेर पडत आहेत आणि ते नागरिकांच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहेत.
पुणे शहरात रोजचा तब्बल १६०० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी ४५ ते ५० टक्के ओला कचरा आहे, तर उरलेला इतर प्रकारचा कचरा आहे. त्याच प्लास्टिकचे प्रमाणही मोठे आहे. असा कचरा सुमारे ३० ते ३५ टक्के इतका आहे. हा कचरा मोठय़ा प्रमाणात उघडय़ावर जाळला जात आहे.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकच्या कचऱ्याचे वजन कमी असते आणि आकारमान जास्त असते. या कचऱ्यामध्ये जवळजवळ ६४ प्रकारच्या वस्तू येतात. त्यापैकी १४ प्रकारच्या वस्तू कचरा वेचकांकडून गोळा केल्या जातात. हे प्लास्टिक पुनप्र्रक्रियेसाठी पाठवले जाते. त्याचे प्रमाण रोजचे सुमारे १०० ते १२५ टन इतके आहे. उरलेले प्लास्टिक तसेच पडून राहते. सध्या अनेक भागात नागरिकांकडून कचऱ्याची विभागणी योग्य पद्धतीने होत नसल्याने हा कचरा एकत्रच टाकला जातो. तो नागरिकांकडून तसाच जाळला जातो. अशा प्रकारे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे रोजचे प्रमाण जवळजवळ २५० ते ३०० टन इतके जास्त आहे. ही समस्या मुख्यत: महापालिकेचे टिळक रोड, भवानी पेठ, कोंढवा, घोले रोड, संगमवाडी, वारजे या प्रभागांमध्ये आहे. तसेच, झोपडपट्टय़ा आणि गावठाणांमध्ये कचऱ्याच्या विभागणीचा प्रश्न आहेच.
कचरा उघडय़ावर जाळणे थांबवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात अशा प्रकारे कचरा जाळल्यास दंड करणे, त्या त्या भागाची जबाबदारी असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणे या उपायांचा समावेश आहे. मात्र, त्याला फारसे यश मिळत नाही. कारण शहरात अनेक ठिकाणी कचरा उघडय़ावर जाळला जात असलेले पाहायला मिळत आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आलेल्या ‘रोकेम’च्या प्रकल्पाबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा प्रकल्प सुरू आहे का आणि असेल तर तो पूर्ण क्षमतेने वापरला जात आहे का, असा सवाल अभ्यासकांनी केला आहे.
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची?
‘‘प्लास्टिकच्या कचऱ्याची नियंत्रित पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘रोकेम’ कंपनी आणण्यात आली. मात्र, ती बंदच आहे. सुरू असतानाही तिचा वापर पूर्ण क्षमतेने का केला जात नाही? प्लास्टिकचा कचरा १२०० अंश सेल्सिअस तापमानाला किंवा त्याच्यावर जाळला गेला तर त्यातून केवळ कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. इतर कर्करोगाला कारणीभूत ठरणारे ‘डायॉक्सिन’ गटाचे घातक वायू बाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकची अशाच पद्धतीने विल्हेवाट लावली जाणे आवश्यक आहे.’’
– हेमंत गोळे (पर्यावरण अभ्यासक)