कामगार भयभीत झाल्याची लघुउद्योजकांकडून तक्रार

पुणे : संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची पोलिसांकडून अडवणूक होत असून कामगार भयभीत झाले आहेत, अशा तक्रारी लघुउद्योजकांकडून करण्यात आल्या आहेत.

वारजे, उत्तमनगर, धायरी भागात लघुउद्योग आहे. तेथे काम करणारे अनेक कामगार परप्रांतीय आहेत. शहरात शनिवारपासून (३ एप्रिल) कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी सहानंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. उत्तमनगर, वारजे भागातील खासगी कंपन्यांमधून अनेक कामगार सायंकाळी सहानंतर बाहेर पडतात. संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर कामगारांना अडवले जातात. कंपनीचे ओळखपत्र दाखवूनही त्यांना अडवले जाते, अशी तक्रार एका लघुउद्योजकाने ‘लोकसत्ता’ शी बोलताना केली.

वारजे भागात एका कामगाराला अडवून त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली, असा आरोप लघुउद्योजकाने केला. टाळेबंदीत व्यवसाय बंद होते. खासगी कंपन्या बंद होत्या. त्या वेळी अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. हळूहळू व्यवसाय, खासगी उद्योग, लघुउद्योग  पूर्वपदावर येत असताना शहरात  पुन्हा करोनाचा संसर्ग वाढीस लागला. परप्रांतातील कामगार पुन्हा पुण्यात परतले. संचारबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर कामगारांची अडवणूक करण्यात येत असल्याने ते भयभीत झाले आहेत. पोलीस सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी कामगारांकडून करण्यात आल्या आहेत.

लसीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई

खासगी कंपनी, लघुउद्योगातील कामगारांचे लसीकरण न केल्यास दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. लशींचा साठा तसेच लस देण्यासाठी ठरवलेली मर्यादा पाहता प्रत्येक कामगाराला तातडीने लस देण्याची प्रक्रिया लगेचच पार पाडता येत नाही, अशी व्यथा एका लघुउद्योजकाने मांडली.

सायंकाळी सहानंतर कामावरून घरी परतणारे कामगार, व्यावसायिक तसेच वैद्यकीय कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अडवणूक करू नये, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात आले आहे. निर्बंधातही पोलिसांनी मानवतावादी दृष्टिकोन बाळगून नागरिकांना सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. एखाद्याकडे ओळखपत्राची मागणी केल्यास ती अडवणूक होत नाही. खासगी कंपन्यांनी कामगारांना पत्र द्यावे. ओळखपत्र पत्र दाखविल्यास पोलिसांकडून अडवणूक होणार नाही. – डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस