अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

दोन व्यवस्था हा देशापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे देशात समांतर सरकार चालवतात, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पिंपरीत बोलताना केली. काँग्रेस त्याविरोधात काहीही पाऊले उचलत नाही. काहीही करून हे समांतर शासन संपवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

वंचित बहुजन विकास आघाडीच्या पिंपरीतील महाअधिवेशनात बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की संघाच्या ओठात एक पोटात एक असते. लोकांची गरिबी दूर करायची नाही, त्यांना हाताला काम द्यायचे नाही. देशाची व्यवस्था बिघडून टाकायची आणि घटना बदलायची, असे त्यांचे कटकारस्थान होते. बिहार निवडणूक हरल्यानंतरही ते सुधारले नाहीत. डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याकडे घातक शस्त्रं सापडली. भाजपला दंगल घडवायची होती का, ही हत्यारे एखाद्या मुस्लिमाकडे सापडली असती, तर सरकार त्याला दहशतवादी ठरवून मोकळे झाले असते. सरकारचा हा दुहेरी मापदंड आहे. काँग्रेसने संघाला संविधानाच्या चौकटीत कसे आणायचे, याचा आराखडा द्यावा. मग, आमच्याशी समझोत्याच्या गोष्टी कराव्यात. मात्र, काँग्रेसचे मौन आहे.

पुणे जिल्हा सत्तेचे माहेरघर आहे. मात्र, कुपोषणामुळे कित्येक बालके मृत्युमुखी पडली आहेत. पालघर, कल्याण, पुण्यात झालेल्या कुपोषणाची आकडेवारी बाहेर येत नाही. तरूण, विद्यार्थ्यांला त्याच्या आवडीचे शिक्षण देणारी व्यवस्था असली पाहिजे. सध्या शिक्षणावर अवघा सव्वा तीन टक्के खर्च केला जातो. आम्ही सत्तेत आल्यास १० टक्के खर्च करू.

आमदार जलील म्हणाले, की काँग्रेसने बारा जागा देऊन आंबेडकर यांचा सन्मान ठेवावा. प्रियंका गांधी यांच्यात काँग्रेसला इंदिरा गांधी दिसत असतील तर प्रकाश आंबेडकर यांच्यात बाबासाहेब का दिसत नाहीत.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले..

  • सरकार शिक्षणाबाबत काहीही करत नाही. आरक्षण-बिगर आरक्षणवाल्यांमध्ये भांडणे मात्र लावते
  • सहकारी कारखाने मोडीत काढून खासगी कारखान्यांची भरभराट करण्याचा घाट
  • सत्तेत आल्यास खासगीकरण बंद करू, कंत्राटी कामगार कायम करू
  • राज्यकर्त्यांचे फक्त टक्केवारीकडे लक्ष, सत्ताधाऱ्यांनी तरूणांना व्यसनाधीन केले
  • लोकशाहीत कुटुंबशाही चालणार नाही, कर्तृत्वाचे मापदंड असले पाहिजे
  • ७० वर्षांत दलितांचा विकास झाला नाही