व्यासपीठाला दिलेले मंडालेच्या तुरुंगाचे प्रतिरुप आणि तुरुंगाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडणारे लोकमान्य टिळक.. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या कार्याची दिली जाणारी सचित्र माहिती.. प्रत्येक स्वातंत्र्यवीराच्या वंशजांचा होणारा सन्मान.. ‘वंदे मातरम्’, ‘इन्किलाब झिंदाबाद’ आणि ‘भारतमाता की जय’ या घोषणांचा होणारा गजर.. मंडालेच्या तुरुंगातून सुटून लोकमान्य पुण्यात आले या घटनेची शताब्दी साजरी होत असताना स्वातंत्र्यवीरांच्या वंशजांसह गणेश कला क्रीडा मंच येथे उपस्थित प्रत्येकाने उत्स्फूर्त देशप्रमाने भारलेली अद्भुत आणि रोमांचकारी सायंकाळ अनुभवली.
निमित्त होतं लोकमान्य टिळक विचार मंच आणि लोकमान्य टिळक स्मृती अभियानतर्फे आयोजित कार्यक्रमाचे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उदयसिंह पेशवे, अभियानाचे अध्यक्ष शैलेश टिळक, नगरसेविका मुक्ता टिळक, रोहित टिळक, बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, आमदार गिरीश बापट, ज्येष्ठ पत्रकार अरिवद व्यं. गोखले, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक या वेळी उपस्थित होते. लोकमान्यांच्या मंडालेहून सुटकेच्या शताब्दीचे औचित्य साधून अभियानातर्फे प्रकाशित ‘लोकमान्य’ या फोटोबायोग्राफीचे आणि ‘अग्निशिखा’ या स्मरणिकेचे प्रकाशन जावडेकर यांच्या हस्ते झाले. ‘जडण-घडण’ मासिकाच्या विशेषांकाचेही प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.
जो समाज क्रांतिकारकांचे स्मरण ठेवतो तोच देश प्रगती करू शकतो, असे सांगून प्रकाश जावडेकर म्हणाले,‘‘अंदमानच्या सेल्युलर जेलमधील सावरकरांविषयीची माहिती देणारी काढून टाकण्यात आलेली पट्टिका पुन्हा सन्मानाने बसविण्यात येणार आहे. मनामनामध्ये देशभक्तीची ज्योत पुन्हा चेतविण्यासाठी क्रांतिकारकांची चरित्रे स्वतंत्रपणे प्रकाशित केली जातील. क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आता सुराज्य करण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचे आहे.’’
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,‘‘स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशातून समाजाला एकत्रित करण्यासाठी सुरू केलेले शिवजयंती आणि गणेशोत्सव हे लोकमान्यांचे राजकीय ‘इनोव्हेशन’ होते. त्यांनी सांगितलेली स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रशिक्षण ही चतु:सूत्री आजही लागू पडते. देशाच्या सुराज्यासाठी भ्रष्टाचार, नकारात्मक विचार, अकार्यक्षमता आणि निष्क्रियता यावर बहिष्कार टाकण्याची आवश्यकता आहे.’’
लोकमान्यांच्या मंडाले सुटकेच्या शताब्दीचे औचित्य साधून केंद्र सरकारने टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करावे, अशी अपेक्षा क्रांतिकारक शरयू शरण यांचे वंशज डॉ. राकेश रंजन यांनी व्यक्त केली. बाबासाहेब पुंरदरे यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश टिळक यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. हिमानी सावरकर यांनी आभार मानले.