पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता १८ झाला आहे. आज चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर अद्यापही सातजण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या बेफाम पावसाने सर्वत्र अक्षरशा थैमान घातले होते. यामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असून शहराचे मोठे नुकसानही झाले आहे. मनुष्यहानी बरोबरच अनेक जनावरांचा देखील या अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली होती.

प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या. पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग असलेल्या नाल्यांमध्ये अनेक वर्षांत बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप नागरिकांना बसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

शहरामध्ये सहकारनगर, अरण्येश्वर भागात टांगेवाला कॉलनीत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून एकाच ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. सहकारनगर भागात वीर सावरकर सोसायटीत पाण्याच्या लोंढय़ात बंगल्याची भिंत कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता भागात एक दुचाकीस्वार महिला आणि मोटारचालक बांधकाम व्यावसायिक मोटारीसह वाहून गेले. केळेवाडी पुलावरून एक मोटार पाण्यात वाहून गेली. ती गुरुवारी संध्याकाळी नाल्यामध्ये सापडली. मात्र, त्यातील तीन तरुण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कात्रज येथील स्मशानभूमीजवळ पाण्यात वाहून आलेल्या मोटारीत एकाचा मृतदेह सापडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.