“मी मागील ३५ वर्षांपासून पाटील इस्टेटमध्ये राहत असून आजवर अनेक घटना पाहिल्या आहेत. मात्र, तीन दिवसांपासून आमची घरं पुराच्या पाण्याखाली गेली आहे. असा पाऊस आजवर पहिला नव्हता आणि अशी घटना देखील. घरातील वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत, आता फक्त राहिल्यात त्या चार भिंती. या भिंती पाहण्यापलीकडे आता आमच्याकडे काहीच राहिले नाही,” असे नदीच्या पाण्याचा फटका बसलेल्या पाटील इस्टेटमधील कलावती मिसाळ यांनी सांगितले. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

पुणे शहरात मागील आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. अशाच स्वरूपाचा पाऊस खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणक्षेत्रात झाल्याने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत सर्व धरणे १०० टक्के भरली. यामुळे सुरुवातीला २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल दुपारपर्यंत ४५ हजार ४७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. यामुळे मुळा आणि मुठा नदी पात्रालगत असलेल्या शांतीनगर, इंदिरानगर, विश्रांतवाडी, वाकडेवाडी पाटील इस्टेट, राजीव गांधीनगर कामगार पुतळा, बोपोडी आदर्शनगर, औंध, बाणेर, बालेवाडी, साईनाथनगर, ताडीवाला रोड झोपडपट्टी, मंगळवार पेठ येथील वसाहतींना पावसाच्या पाण्याचा फटका बसला. मागील तीन दिवसांपासून या वसाहतींमधील बहुतांश घरे पाण्याखाली गेली. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्यावतीने या नागरिकांची शाळा, महाविद्यालये आणि समाजमंदिरांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आपलं घर पुन्हा केव्हा पाहण्यास मिळेल याकडे सर्व जण डोळे लावून बसले होते.

काल दुपारनंतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने टप्प्या टप्प्याने विसर्ग कमी करण्यात आला यामुळे नदीतील पाणी हळूहळू कमी होऊ लागले. त्यानंतर प्रत्येक नागरिक घराच्या दिशेने धाव घेऊन नेमके काय झाले आहे हे पाहत होते. आजवर जेवढे कमाविले होते नव्हते ते सर्व पाण्यात वाहून गेल्याचे पाहून सर्वजण हताश झाले आहेत. मात्र, एवढे मोठे संकट उभे राहिले असताना पुन्हा संसार उभा करण्यासाठी घर स्वच्छ करीत होते.

अशाच एका म्हणजे पाटील इस्टेट (झोपडपट्टी) वसाहतीमधील नागरिकांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने संवाद साधला. इथे राहणारा इयत्ता नववीमध्ये शिकणारा वैभव शिंदे म्हणला, नदीमधील पावसाचे पाणी आमच्या घरात शिरल्यामुळे मी, आई आणि ताई आम्ही तिघे जण महापालिकेच्या शाळेत तीन दिवसापासून राहत आहोत. घरातील ज्या काही वस्तू होत्या. त्या पाण्यात भिजल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. आता नव्याने सर्व खरेदी करावी लागणार आहे. आई धुणं भांडयाची काम करीत असल्याने आमचे घर चालते. पण एवढे नुकसान झाल्याने एवढे पैसे कसे जमवायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वैभवसारखी अनेक कुटुंबांची परिस्थिती त्या ठिकाणी पाहण्यास मिळाली. आता या सर्वांना प्रशासनाच्यावतीने कशा प्रकारे मदत केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.