डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी तपासात पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅंचेटचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन झालेले आढळले तर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.
गुलाबराव पोळ यांनी प्लॅंचेट केल्याचा आरोप पत्रकार आशिष खेतान यांनी एका इंग्रजी नियतकालिकात लिहिलेल्या लेखामध्ये केला आहे. पुरावे म्हणून त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार पोळ आणि इतर पोलीस अधिकाऱयांविरुद्ध कारवाई करणार की नाही, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित करण्यात येत होता.
आर. आर. पाटील म्हणाले, पुण्याचे पोलीस आयुक्तपद हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. त्यामुळे त्या किंवा त्यावरील पदाच्या अधिकाऱयांकडूनच या प्रकाराची चौकशी केली गेली पाहिजे. गृह मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आठवड्याभरात चौकशीचा अहवाल आम्हाला मिळेल. त्यामध्ये जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. चौकशी निष्पक्षपातीपणे केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.