मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुप्रतीक्षित पिंपरी दौरा आता निश्चित झाला आहे. मनसेच्या शहरप्रमुखाने पक्षश्रेष्ठींवरच केलेले गंभीर आरोप, तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांची अनामत जप्त, गटबाजीचे राजकारण आणि एकूणच विस्कळीत यंत्रणा, अशी मनसेची परिस्थिती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात १५ फेब्रुवारीला पक्षाध्यक्ष राज येत आहेत.
गेल्या वर्षी २१ व २२ नोव्हेंबर रोजी ठरलेला दौरा राज ठाकरे यांनी अचानक रद्द केल्याने मनसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. राज यांच्या नियोजित दौऱ्यात नव्या शहरप्रमुखाची नियुक्ती तसेच कार्यकारिणीसह महापालिका निवडणुकांची व्यूहरचना शक्य असल्याचे सांगण्यात आले. मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत राज यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी १५ फेब्रुवारीला शहरात येण्याचे मान्य केले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी, २००७ च्या महापालिका निवडणूक प्रचारासाठी राज िपपरीत आले होते. तेव्हा मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यानंतर २००९ च्या विधानसभेत तीनही मतदारसंघांत मनसेचे उमेदवार नव्हते. पुढे २०१२च्या महापालिका निवडणुकीत राज फिरकले नाहीत. तरीही मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते आणि अनेक उमेदवारांनी लक्षणीय मतेही घेतली होती.
लोकसभेत शेकाप उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी ते चिंचवडला आले होते आणि काही कार्यक्रमातही उपस्थित होते. तथापि, मनसेच्या कार्यक्रमांसाठी ते आले नव्हते. त्यांनी शहरात यावे, यासाठी बरेच प्रयत्न झाले होते. विधानसभेत राज्यभरात मनसेला अपयश आले. पिंपरीतील तीनही मतदारसंघांत मनसेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. पक्षातील गटबाजीही उफाळून आली. पक्षयंत्रणा मोडकळीस आली. त्यानंतर गेल्या वर्षी राज यांचा ठरलेला दौरा रद्द झाल्याने मनसे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता ठाकरेंनी पिंपरीत येण्याचे मान्य केल्याने मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.