कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत कोणताही अबोल नसल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी मंगळवारी सरकारमधून बाहेर पडण्याचा सामुहिक निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. सदाभाऊ यांच्याकडे कृषी राज्यमंत्रीपद आहे. मात्र त्यांना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकार त्यांचा ढाल म्हणून वापर करते आहे, असे ते म्हणाले.  पुण्यातील विधानभवनात पार पडलेल्या शेतकरी आंदोलनात राजू शेट्टी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सामुहिकरित्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले.

[jwplayer jtlCMRw8]

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकार जर वस्तू व सेवा कर विधेयक लागू (जीएसटी) करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे. हा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांचा प्रश्न नक्की सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तूर खरेदी घोटाळ्यात सरकारी अधिकारी आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करून व्यापाऱ्यांनी ती नाफेडला विकल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.

तुरीच्या प्रश्नावर ते म्हणाले, नाफेडने फेब्रुवारीत तुरीची खरेदी करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी ३ हजार ६०० रुपये ते ४ हजार २०० रुपये इतका कमी भाव दिला होता. ५ हजार ५० रुपयाने तूर खरेदी करून ३ हजार ६०० रुपयाने विकण्याला सरकारचा शहाणपणा म्हणत नाही. सर्व तूर खरेदी करेपर्यंत नाफेडने विक्री करण्याची गरज नव्हती. त्यांनी हीच तूर बाजारात फिरवली जात आहे, इतके ओळखण्याची साधी अक्कल सरकारला नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी आत्महत्येवरही राजू शेट्टींनी यावेळी भाष्य केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या, यावर मुख्यमंत्री शेतकरी पुन्हा आत्महत्या करणार नाही याची शाश्वती मागतात. परंतु ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा कर्जमाफीसाठी आग्रही होते. त्यामुळे शेतक-याला गृहीत धरण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.

[jwplayer j3j7Qo2n]