पुणे पोलीस दलातील कामकाजासंदर्भातील संगणक प्रणाली विकसित करणारे टेक्नोसॅव्ही पोलीस हवालदार रवींद्र इंगवले यांनी विकसित केलेल्या कम्प्लेंट अॅप्लिकेशन मॅनेजमेंट सिस्टीम या संगणक प्रणालीची देशपातळीवर झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात दखल घेण्यात आली आहे. इंगवले यांनी विकसित केलेल्या संगणक प्रणालीला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची चाचणी, व्यावसायिक कौशल्य पडताळणीसाठी दरवर्षी राज्य आणि देशपातळीवर कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचा देशपातळीवरील पोलीस कर्तव्य मेळावा नवी दिल्ली येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडला. या मेळाव्यात देशभरातील १९ राज्यातील पोलीस दलातील क र्मचाऱ्यांनी ४८ संगणक प्रणाली सादर केल्या होत्या. यामध्ये बिनतारी संदेश विभागातील पोलीस हवालदार रवींद्र इंगवले यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. हवालदार इंगवले हे सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत  आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या पोलीस महासंचालकांनी इंगवले यांनी विकसित केलेल्या संगणक प्रणालीला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले.
इंगवले हे बारावी उत्तीर्ण आहेत. सन १९९४ मध्ये ते बिनतारी संदेश विभागात (वायरलेस) रुजू झाले. त्यानंतर त्यांनी सीडॅकचा अभ्यासक्रम केला. त्यांनी आतापर्यंत पुणे शहर पोलीस दलासाठी २० संगणक प्रणाली तयार केल्या आहेत. तसेच पोलीस दलातील अन्य विभागांसाठी चार संगणक प्रणाली इंगवले यांनी तयार केल्या आहेत. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी इंगवले यांचे कौतुक केले आहे.
गृहमंत्री, गृह राज्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिक तक्रार घेऊन येतात. काही तक्रारअर्ज आणि विनंती स्वरूपातील अर्जाचा यामध्ये समावेश असतो. या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात पाठवाव्या लागतात. या तक्रारी  कम्प्लेंट अॅप्लिकेशन मॅनेजमेंट सिस्टीममधून पोलीस ठाण्यांना पाठवल्या जातात. तसेच या तक्रारअर्जावर पोलीस निरीक्षकाने कार्यवाही केली का नाही याचीदेखील माहिती या संगणकीय प्रणालीमुळे मिळते.

मेड बाय पोलीस
शासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेल्या प्रणालीचा वापर केला जातो. मात्र, हवालदार इंगवले यांच्या संगणकीय कौशल्याचा फायदा पुणे पोलिसांना झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील संगणकीय प्रणाली विकसित करण्यात इंगवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे शासकीय खर्चात देखील बचत झाली आहे. त्यामुळे इंगवले यांचे काम म्हणजे मेड बाय पोलीस असे ठरले आहे.