मराठी चित्रपट आणि नाटय़ सृष्टीचा प्रसार वेगाने व्हावा, यासाठी घेतलेल्या निर्णयांसाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे यांना ‘सलाम पुणे’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच, जनसंपर्क कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळवणाऱ्या कल्पना थोरवे यांना कार्यक्षम नगरसेविकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या शिवाय ‘ये रे ये रे पावसा’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ या दोन नाटकांना उत्कृष्ट नाटकांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
‘सलाम पुणे’ या संस्थेच्या वतीने नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वेळी मराठी रंगभूमी दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्री लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, ज्योती चांदेकर, जयमाला काळे, अभिनेता स्वरूप कुमार, राघवेंद्र कडकोळ, वसंत अवसरीकर, सदानंद चांदेकर, भालचंद्र पानसे आणि मनोरंजन नाटय़ संस्थेचे मनोहर कुलकर्णी या दहा ज्येष्ठ रंगकर्मीचा या वेळी गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
नाटक आणि चित्रपट अनुदान योजनेत महत्त्वपूर्ण बदल सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केले आहेत. त्यानुसार यापुढे पहिल्या चित्रपटालाही अनुदान मिळणार आहे. ‘अ’ दर्जाप्राप्त मराठी चित्रपटाला ३० लाखांऐवजी ४० लाख रुपये आणि ‘ब’ दर्जाप्राप्त चित्रपटाला २० लाखांऐवजी ३० लाख रुपये असे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे. तसेच, डिजिटल चित्रपटांसाठीही अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचप्रमाणे नाटय़संस्थेचा दर्जा पाहण्याची अट वगळण्यात आली असून नाटकांचा दर्जा पाहून अनुदान दिले जाणार आहे. यासाठी देवतळे यांना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे संयोजकांनी सांगितले.