09 December 2019

News Flash

संजय पवार यांचा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना सवाल

शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत होता तेव्हा तुम्ही कोठे होता? आता चॅरिटी कसली करताय, असा सवाल संजय पवार यांनी केला.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेकडून दोन गावे दत्तक.

शेतमालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत होता तेव्हा तुम्ही कोठे होता? मॉलची वीज बंद करून शेतीचे वीजपंप सुरू करा अशी मागणी का नाही करत?  सामान्य माणूस कररूपाने इतके पैसे सरकारला देतो. आता पुन्हा त्याच्याकडेच का मागितले जातात, शेतकरी अचडणीत येण्यापूर्वीच आपल्या प्रतिष्ठेचा उपयोग का केला नाही? आता चॅरिटी कसली करताय, अशा शब्दांत प्रसिद्ध लेखक-नाटककार संजय पवार यांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
डायमंड पब्लिकेशन्सच्या ‘डायमंड गप्पाष्टक’ या उपक्रमाचा शुभारंभ संजय पवार यांच्या मुलाखतीने झाला. चित्रकार, कार्यकर्ते, चित्रपट पटकथाकार आणि महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणाचे भाष्यकार असे संजय पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू पत्रकार राम जगताप यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडले. दत्तात्रय पाष्टे यांनी स्वागत केले.
मल्टिप्लेक्सला जातो तेव्हा तिकिटासाठी ३०० रुपये आणि पॉपकॉर्नसाठी ८० रुपये मोजताना आपण खळखळ करीत नाही. मग, कांदा ८० रुपये किलो झाला म्हणून एवढा गदारोळ कशासाठी केला जातो? बरं, कांदा वाढला तरी ती किंमत शेतकऱ्याला थोडीच मिळते? आडते आणि दलालांचेच फावते, याकडे लक्ष वेधून संजय पवार म्हणाले, एकदा पैसे दिले की भागले असे होते का? तुमचे तुम्ही बघून घ्या असे म्हणून चालणार नाही. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना का काही करत नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी काही वेगळी कारणे आहेत का त्याचाही विचार झाला पाहिजे. एखाद्याला दैवत मानले की त्याला सारे गुन्हे माफ असतात अशीच आपली धारणा झाली आहे.
कलाकाराने परिवर्तनवादी असले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले,की कम्युनिस्ट विचारसरणीने चांगले साहित्य, नाटके, चित्रपट समाजाला दिले. विचारसरणीने कलाकार कुंठित होत नाही. नंतर, कम्युनिस्ट पोथीनिष्ठ झाले हे वास्तव असले तरी मूळ विचार परिवर्तनाचाच आहे. आधीचे साचे मोडले तरच नवीन निर्माण होते. त्यासाठी विद्रोह हा करावाच लागतो. माझ्या लेखनातून कार्यकर्ता दिसत असेल तर तो मी अभिप्राय आहे असेच समजेन. गेली २५ वर्षे पुण्यात वास्तव्यास असल्याने उपरोध हा माझ्या लेखनाचा स्थायीभाव झाला आहे. मंडल आयोगाचा उद्देश चांगला होता. मात्र, दुर्दैवाने त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी झाला. आता कोणतीही जात उठते आणि आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करीत आहे. भारतीय समाज टोकाच्या उजव्या विचारसरणीकडे जाऊ शकत नाही. तसे असते, तर काँग्रेसने ६० वर्षांपूर्वीच भारताला हिंदूुराष्ट्र केले असते.

First Published on September 20, 2015 3:27 am

Web Title: sanjay pawar slams nana petekar and anaspure
Just Now!
X