पुणे रेल्वे कर्मचाऱ्यांचे टाकाऊतून टिकाऊ काम

पुणे : जुनी झाल्याने रेल्वेच्या सेवेतून बाद झालेली आणि काही दिवसांतच भंगारात निघणार असलेल्या पेंट्रीकारला रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपाहारगृहात रूपांतरित केले आहे. टाकाऊतून टिकाऊ स्वरूपाचे काम करीत ही पेंट्रीकार आता पुढील कित्येक वर्षे कार्यरत राहू शकणार आहे. घोरपडी येथील रेल्वेच्या कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये तयार झालेल्या या उपाहारगृहाचे नाव ‘अन्नपूर्णा’ ठेवण्यात आले आहे.

रेल्वेतून बाद झालेले साहित्य, डबे किंवा इंजिन घोरपडी येथील रेल्वेच्या जागेत ठेवले जाते. वाहतुकीच्या दृष्टीने बाद झालेल्या वस्तू भंगारात विकल्या जातात. भंगार साहित्याने अडविलेली जागा इतर कामांसाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रेल्वे विविध वस्तू भंगारात विक्रीसाठी काढते. त्यातच या पेंट्रीकारच्या डब्याचा समावेश होता. रेल्वेमध्ये खानपान व्यवस्था आणि प्रवाशांना त्याचा लाभ देण्यासाठी पेंट्रीकारच्या डब्याचा उपयोग होता. असाच एक डबा भंगारामध्ये पडून होता. रेल्वेतील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी तो पुन्हा उपयोगात आणण्याच्या दृष्टीने योजना आखून त्याचे कर्मचाऱ्यांसाठी उपाहारगृहात रूपांतर केले आहे.

पेंट्रीकारपासून तयार करण्यात आलेल्या अन्नपूर्णा उपाहारगृहात अंतर्गत भागात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बसून खाद्यपदार्थाचा अस्वाद घेण्यासाठी विशेष रचनेच्या आसनांचीही व्यवस्था आहे. या सर्वासाठी रेल्वेत उपलब्ध असलेल्या टाकाऊ किंवा जुन्या झालेल्या साहित्याचा उपयोग केला आहे. या उपाहारगृहात एका वेळी ३६ कर्मचारी बसू शकतात. या सेवेचे उद्घाटन पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा आणि मुख्य यांत्रिक अभियंता ए. के. गुप्ता यांच्या हस्ते झाले. वरिष्ठ यांत्रिक अभियंता विजयकुमार दडस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित उपाहारगृह सज्ज करण्यात आले आहे.