प्राध्यापक भरतीसाठी राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी (सेट) आता मुहूर्त मिळणार आहे. या जूनमध्ये सेट घेण्यासाठी परवानगी मिळू शकते, अशी माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षभरात राज्यात सेट न झाल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले होते.
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षक भरतीसाठी सेट घेण्यात येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र आणि गोव्यातील सेटचे आयोजन करते. वर्षांतून दोन वेळा म्हणजे जून आणि डिसेंबरमध्ये सेट घेण्यात यावी असे संकेत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात एकही सेट झाली नाही. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये सेट घेण्यात आली होती. परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) परवानगी न मिळाल्यामुळे सेट रखडली होती. मात्र, आता सेटच्या आयोजनासाठी विद्यापीठ जूनचा मुहूर्त साधणार आहे.
आयोगाच्या सुकाणू समितीकडून आधीच्या परीक्षांची पाहणी करण्यात येते. त्यानंतरच पुढील परीक्षेसाठी परवानगी देण्यात येते. आयोगाच्या सुकाणू समितीने विद्यापीठाला नुकतीच भेट दिली असून जूनमध्ये सेट घेण्यास संमती दर्शवली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक मार्च अखेपर्यंत प्रसिद्ध होईल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे असा खोळंबा होऊ नये, यासाठी २ किंवा ३ परीक्षा घेण्यासाठी संमती देण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.