राज्य सहकारी शिखर बँक घोटाळयाप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर राज्यभरात शरद पवार यांच्याकडून लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट केला गेला आहे. अशा शब्दात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज पुण्यात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, भाजपा शहर अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ आदींची याप्रसंगी उपस्थित होती.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सहकारी शिखर बँक घोटाळाप्रकरणी २०१० मध्ये आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. १०० कोटींच्या पुढे गैरव्यवहार असेल, तर ईडी विभागाला संबधीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहे. त्यानुसार शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या माध्यमातून नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी शरद पवार यांनी याचा राजकीय इव्हेंट केला आहे. तसेच, यापुर्वी छगन भुजबळ यांना अटक झाली, त्यावेळी कोणी का समोर आले नाही? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. युती केव्हा होणार या प्रश्नावर ते म्हणाले की, युतीची बोलणी शेवटच्या टप्यात असून कोणत्याही क्षणी युती झालेली तुम्हाला ऐकण्यास मिळेल. याद्वारे त्यांनी युती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात ही परिस्थिती
पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी आणि मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. शहरातील घटनास्थळाची पाहणी केली आहे. अनपेक्षितपणे झालेल्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, अशा घटनेच्या वेळी कोणीही राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी ते म्हणाले की, पुणे शहरात अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात परतीचा पाऊस झाल्याने बुधवारी रात्री मुसळधार पावसाला पुणेकरांना सामोरे जावे लागले. यात नाहक १४ जणांचा मृत्यू, तर ९ जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ९ बेपत्ता व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेण्याचे काम सुरू असून, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक स्वरूपाची मदत नियमानुसार केली जाणार आहे. तसेच, सांगली आणि कोल्हापूर येथील परिस्थितीचे नियम देखील लागू करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. याबाबत लवकरच निवडणूक आयोग निर्णय जाहीर करेल असेही त्यांनी सांगितले.

टांगेवाला कॉलनी परिसरात  नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले
पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे टांगेवाला कॉलनी परिसरात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी भेट देण्यास गेले असता. तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यांना याबाबत राजकारण करायचे आहे. त्यांना करू द्या, मी तिथे जाऊन. तेथील स्थानिक रहिवाशांशी बोललो आहे. त्या सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. साधारण अर्ध्या तासानंतर बाहेरील काही २० ते २५ नागरिक येऊन गोंधळ करण्याचा प्रकार केला आहे. असे स्पष्टीकरण त्यावर त्यांनी दिले.