युतीबाबत दानवे यांचा सूचक इशारा

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण पसरले असतानाच युतीबाबत सकारात्मक असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी स्पष्ट केले. पण युतीवरून शिवसेनेला सूचक इशाराही त्यांनी दिला. ‘राजकारणात कोणी कोणाची वाट पाहात नाही. वाट पाहात बसलो तर फसवेगिरी होण्याची शक्यता असते,’ असे सूचक वक्तव्य दानवे यांनी पुण्यात सोमवारी केले. दरम्यान, युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले असले तरी मुंबईतील घडामोडींवर पुण्यातील युतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्षही मुंबईकडे लागले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. प्राथमिक स्तरावर सुरू झालेल्या या चर्चेबाबत दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक तर कधी नकारात्मक असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या विधानांवरून युती संपुष्टात आल्याचीच सध्या चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगतानाच रावसाहेब दानवे यांनी हा सूचक इशारा पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

‘युतीबाबत सेनेला कोणतीही ‘डेडलाईन’ देण्यात आलेली नाही. युतीबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. युती झाली तर ठीक, अन्यथा आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी युती करणे शक्य आहे, त्या ठिकाणी युती करावी, अशी आमची भूमिका आहे. महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. मात्र राजकारणात कोणी कोणाची वाट पाहात नाही. वाट पाहात बसलो तर फसवेगिरी होण्याची शक्यता अधिक असते,’ असे दानवे यांनी नमूद केले.

स्थानिक नेत्यांचे मुंबईकडे लक्ष

युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले असले तरी पुण्यात युती होणार नाही, अशीच जोरदार चर्चा आहे. मात्र हा निर्णय प्रामुख्याने मुंबईवरच अवलंबून असेल. मुंबई महापालिकेसाठी युती झाली नाही, तर पुण्यातील युतीची चर्चाही आपोपाप संपुष्टात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. पुण्यातील युतीसंदर्भात गेल्या आठवडय़ात प्राथमिक स्तरावर चर्चा झाली होती. त्यानंतर कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुन्हा चर्चा होईल, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केला.